कृषीभूषण प्रभावती घोगरे यांच्या राहुरीतील सभेकडे मतदारांचे लक्ष
राहुरी : अहमदनगर दक्षिण लोकसभेचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी राहुरीत ४ मे रोजी लोणी खुर्द येथील कृषीभूषण प्रभावतीताई घोगरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत त्या काय बोलतात याकडे राहुरीकरांचे लक्ष लागले आहे.
कृषीभूषण सौ. प्रभावती घोगरे या माजी आमदार चंद्रभान दादा घोगरे यांच्या त्या सूनबाई तर कोल्हार येथील प्रतिथयश व्यक्तिमत्व स्व. शंकरनाना खर्डे यांची मुलगी तर मा. सरपंच सुरेंद्र खर्डे यांच्या भगिनी आहेत. विखेंविरोधात मुद्देसूद बोलणारी तोफ म्हणून त्यांची या भागातून विशेष ओळख आहे. विखे गटाच्या कट्टर विरोधक म्हणून त्यांची ख्याती आहे. स्थानिक ग्रामपंचायतीत त्यांचा नेहमीच वरचष्मा राहिला आहे, तर नुकत्याच झालेल्या राहाता तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सौ. घोगरे यांच्या त्या भाषणाने अख्खा धुराळा ऊडवून दिला होता. त्या निवडणुकीत विखे गटाला आपल्याच मतदार संघात फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले होते तर त्यानंतर झालेल्या शिर्डी कामगार पतसंस्थेतही विखे गटाला संपुर्ण पराभवाला सामोरे जावे लागले होते.
आगामी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना राहाता मतदार संघातून महाविकास आघाडीकडून संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यांना तिकीट मिळाल्यास महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील विरूद्ध सौ. प्रभावती घोगरे हा सामना चूरशीचा होणार असे राजकीय विश्लेषकांमधून बोलले जात आहे. त्याच धर्तीवर विखेंच्या गावातील कट्टर विरोधक म्हणून सौ. प्रभावती घोगरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन ४ जूनला राहुरीतील उंबरे येथे केले असून या सभेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.