मंत्रीपद मिळूनही विद्यमान लोकप्रतिनिधी राहुरी मतदार संघाचा विकास करण्यात अपयशी : राधाकृष्ण विखे पाटील
शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रचारार्थ पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राहुरी तालुक्यात झंझावाती दौरा
राहुरी | अक्षय करपे : राहुरी मतदारसंघातील विद्यमान लोकप्रतिनिधींना मंत्रीपदाची संधी मिळाली. त्यांच्या सत्ताकाळात जिल्ह्याला तीन मंत्री मिळाले. एवढे असूनही त्यांनी मतदारसंघात केलेली विकासकामे दाखवून द्यावीत. राहुरीत साधे उपजिल्हा रूग्णालय सुध्दा सुरु करता आले नाही. महायुतीचे सरकार आल्यानंतर एकट्या राहुरी तालुक्यात शेतकऱ्यांना पिक विम्याचे 104 कोटी रुपये मिळाले. कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रत्येकी दहा कोटी रुपये मिळाले. लाडकी बहिण योजनेतून 90 हजार महिलांच्या खात्यावर 34 कोटी रुपये जमा झाले. या सर्व योजनांचा लाभ कोणाच्याही चिठ्ठीशिवाय संबंधितांच्या बँक खात्यात जमा झाला. माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी या मतदारसंघात केलेली विकासकामे आणि महायुती सरकारची दमदार कामगिरी यामुळे कर्डिले यांच्या विजयावर निकालाआधीच शिक्कामोर्तब झाले आहे. विजयाची औपचारिक घोषणा बाकी आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रचारार्थ पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राहुरी तालुक्याचा झंझावाती दौरा करत बारागाव नांदूर, ब्राह्मणी, सोनेगाव, सात्रळ येथे जाहीर सभा घेऊन मतदारांशी संवाद साधला. राहुरी येथे विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, विक्रम तांबे, सुरेश बानकर, उदयसिंह पाटील, धनराज गाडे, देवेंद्र लांबे, प्रभाकर हापसे, माधव ढोकणे, सुरेंद्र थोरात, तानाजी धसाळ, भास्कर गाडे, राजू शेटे, आर.आर. तनपुरे, अण्णासाहेब बाचकर, दीपक पवार, साहेबराव गाडे, शिवाजी सागर, तानाजी गुंड, मीराताई घाडगे, सुभाष गायकवाड आदी उपस्थित होते.
मंत्री विखे पाटील म्हणाले, सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पक्षातील महिला सुद्धा आता त्यांचे ऐकणार नसून त्या महायुतीच्या उमेदवारालाच मतदान करतील. महाविकास आघाडीचे अडीच वर्ष राज्यात सरकार होते तेव्हा हे झोपले होते. त्यावेळी त्यांना लाडकी बहीण का नाही आठवली. कोविड काळामध्ये जनतेला मदतीची गरज होती. तेव्हा या जिल्ह्यातील तीन मंत्री कुठे होते? देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 80 टक्के नागरिकांना मोफत धान्य देण्याचे काम केले. सन 2029 पर्यंत ही योजना चालू राहणार आहे. आता मी राहुरी शहरामध्ये 200 कोटीचे रुग्णालय सरकारच्या माध्यमातून सुरू करणार आहे. आमचे सरकार केंद्रात असून आता राज्यातही परत येणार आहे. त्यामुळे निधीची कमतरता कमी पडू दिली जाणार नाही. बारागाव नांदूर मधील शेतकऱ्यांना एक रुपया पिक विमा पोटी दोन कोटी रुपये मिळाले आहे. देशाचे नेते म्हणणाऱ्या शरद पवारांनी निळवंडे धरणाचे चार वेळा भूमिपूजन केले. मात्र त्याचे खरे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात सुरु झाले. शरद पवार खोटे बोलतात म्हणून मिरी परिसरातील शेतकऱ्यांनी त्यांचे हेलिकॉप्टर उतरून दिले नाही. शरद पवार यांनी आपल्या नगर जिल्ह्याला उध्वस्त करण्याचे काम केले आहे. त्यांच्या काळात कुकडीचे काम दहा वर्षात फक्त चार किलोमीटर झाले होते. मात्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री कै.गोपीनाथ मुंडे यांनी साडेचार वर्षात 70 किलोमीटरचे काम पूर्ण केले. शरद पवार यांचेे नगर जिल्ह्यासाठी काय योगदान हे त्यांना विचारले पाहिजे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी फक्त माझे कुटुंब माझी जबाबदारी इथपर्यंतच मर्यादित राहून घरात स्वत:ला कोंडून घेतले होते. आता राज्यात महायुतीचे सरकार बसल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल.
माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले म्हणाले की, मी नेहमीच विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत असतो. तरी देखील 2019 ला माझा पराभव झाला. पण मी थांबलो नाही. जनतेचे प्रश्न सोडविण्याचे काम केले आहे. तनपुरे कुटुंबियांनी राहुरी साखर कारखाना, सूतगिरणी, विद्यापीठ अशा अनेक संस्थांचे वाटोळे केले. त्यामुळे राहुरीच्या विकासावर परिणाम झाला. आदिवासी मंत्री असताना देखील राहुरी तालुक्यातील आदिवासी समाजाचे प्रश्न ते मार्गी लावू शकले नाहीत. राज्यात कुठलाही आमदार डीपी बसवल्यानंतर उद्घाटन करत नसतात. मात्र हे मंत्री महोदय डीपीचे सुध्दा उद्घाटन करत फिरत होते. राज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीच संपूर्ण राज्याचा डीपी बसविण्याचे आराखडा तयार केला होता. त्यानुसार त्याला मंजुरी देखील दिली होती. दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेण्याचे काम हे करत आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते तेव्हा कधी दूध धंद्याला अनुदान दिले नाही. मात्र पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिलिटर सात रुपये अनुदान दिले आहे. शहरातील एसटी डेपोचे काम मार्गी लावले. यावेळी धनराज गाडे, देवेंद्र लांबे, विक्रम तांबे यांचीही भाषणे झाली. या सर्व सभांना पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवडणूक न लढवण्यासाठी जयंत पाटील यांची ऑफर
मी राहुरी मतदारसंघात यंदाची निवडणूक न लढवण्यासाठी माजी मंत्री जयंत पाटील यांनी मला गुन्हे मागे घेण्याची ऑफर दिली होती. मात्र मी ते अमान्य केले. कारण काही न करता यांनीच माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले. मला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मात्र मी जनतेच्या आशीर्वादामुळे राजकारणात आहे, असे शिवाजीराव कर्डिले यांनी स्पष्ट केले.