आशाव्दारे जीवनात प्रेरणा मिळते — फा. कॅलिस्टस मेनेजेस
हरेगाव येथे आज्ञा गुरुवार दिन भक्तिभावात संपन्न

श्रीरामपूर (बाबासाहेब चेडे) : हरेगाव येथील मतमाउली भक्तिस्थान संत तेरेजा चर्चमध्ये ‘आज्ञा गुरुवार’ हा पवित्र दिवस श्रद्धा, सेवा आणि प्रार्थनेच्या वातावरणात भक्तिभावाने साजरा करण्यात आला. प्रभू येशू ख्रिस्ताच्या शेवटच्या भोजनाच्या स्मरणार्थ दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या या दिवसाचे विशेष महत्व आहे. येशूने शिष्यांचे पाय धुऊन सेवा, प्रेम आणि नम्रतेचा आदर्श घालून दिला.
या विशेष दिवशी आयोजित प्रवचनामध्ये रे फा. कॅलिस्टस मेनेजेस यांनी “आशाव्दारे जीवनात प्रेरणा मिळते” या विषयावर मनोगत व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, “आशा ही केवळ विचार नव्हे तर ती आपल्या जीवनाचा दीपस्तंभ आहे. सेवा आणि प्रेमाच्या माध्यमातून आशा आपल्या आयुष्याला अर्थपूर्ण बनवते. जेथे निराशा आहे तेथे आपण आशेचे दीप प्रज्वलित करणे आवश्यक आहे.”
फा. मेनेजेस पुढे म्हणाले, “चर्चमध्ये साजरे होत असलेले हे वर्ष ‘आशेचे वर्ष’ म्हणून साजरे केले जात आहे. आशा हीच आपल्याला नव्या जीवनाकडे, आरोग्याकडे आणि सुखाकडे घेऊन जाणारी शक्ती आहे. आशा केवळ आपल्या जीवनात नव्हे, तर इतरांच्या आयुष्यात देखील रुजवणं, हीच येशूच्या सेवेची खरी शिकवण आहे.”
“येशूने शिष्यांचे पाय धुतले आणि सांगितले, जशी मी सेवा केली तसे तुम्हीही करा. ही शिकवण म्हणजे एकमेकांवर प्रीती करा आणि सेवेमध्ये आपली आशा प्रगट करा. प्रेमाने कम्युनिटी घरापासून सुरू होते आणि समाजात आशेचे, एकतेचे वातावरण निर्माण होते,” असे फा. मेनेजेस यांनी स्पष्ट केले.
आज्ञा गुरुवारी प्रभू शब्दविधी, शिष्यांची पायधुनी व अन्य धार्मिक कार्यक्रम अतिशय भक्तिमय वातावरणात पार पडले. प्रमुख धर्मगुरू रे फा. डॉमनिक रोझारिओ, फा. फ्रान्सिस ओहोळ यांच्यासह असंख्य श्रद्धाळूंनी या सोहळ्यात सहभाग नोंदवला.
हरेगाव चर्चच्या वतीने येत्या १८ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता पवित्र क्रुसाच्या वाटेच्या भक्तीनिमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. या भक्तिपूर्ण कार्यक्रमात जास्तीत जास्त श्रद्धाळूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रमुख धर्मगुरू डॉमनिक रोझारिओ यांनी केले आहे.