राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघाचा प्रथम वर्धापन दिन सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा होणार – राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार

राहुरी : देशभरातील ग्रामीण पत्रकारांना एकत्र आणून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यरत असलेल्या राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचा पहिला वर्धापन दिन ५ जून रोजी संपूर्ण भारतात विविध सामाजिक उपक्रमांद्वारे मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.
अल्पावधीतच महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, छत्तीसगड, झारखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, दिल्ली, कर्नाटका, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, आसाम, गुजरात, राजस्थान, हरियाणा इत्यादी राज्यांमध्ये संघटनेने आपले कार्यक्षेत्र विस्तारले असून, पत्रकारांच्या न्यायहक्कासाठी संघटना अखंड झटत आहे.
वर्धापन दिनानिमित्त देशभरात विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यात आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर, ग्रामीण व शहरी भागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शालेय साहित्य वाटप, विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरव तसेच पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांनी सांगितले की, “२०२५ हे वर्ष संपण्याआधी भारतातील सर्व राज्यांमध्ये संघटना कार्यरत असेल. संघटनेचे ध्येय केवळ पत्रकारांचे प्रश्न सोडवणे नाही, तर समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी झटणे हे देखील आहे.”
महाराष्ट्रामध्ये तालुका व जिल्हास्तरावर जनसंपर्क कार्यालये सुरू करून गोरगरीब जनतेच्या आणि पत्रकारांच्या अडचणी सोडवण्याचे काम प्रभावीपणे सुरू आहे. कोणत्याही स्पर्धेशिवाय आपल्या ध्येयाशी प्रामाणिक राहून काम करत राहा, असे आवाहन राष्ट्रीय अध्यक्षांनी सर्व पदाधिकारी व सदस्यांना केले आहे.