कृषी

पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र सर्वोत्कृष्ट संशोधन केंद्र पुरस्काराने सन्मानीत

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांचे नेतृत्व व मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राला दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन (डीएसटीए), पुणे यांचेकडून सर्वोत्कृष्ट संशोधन केंद्र पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनच्या 69 व्या वार्षिक अधिवेशन व तंत्रज्ञान परिषद 2024 मध्ये महाराष्ट्राचे माजी सहकार मंत्री व राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष ना. हर्षवर्धन पाटील, महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, रेना सहकारी साखर कारखन्याचे अध्यक्ष दिलीपरावजी देशमुख आणि डीएसटीएचे अध्यक्ष शहाजी भड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पाडेगाव संशोधन केंद्राचे ऊस विशेषज्ञ डॉ. राजेंद्र भिलारे, ऊस रोगशास्त्रज्ञ डॉ. सुरज नलावडे, शरीरक्रिया शास्त्रज्ञ डॉ. कैलास भोईटे, ऊस पैदासकार डॉ. सुरेश उबाळे, ऊस बेणे विक्री अधिकारी डॉ. दत्तात्रय थोरवे, कनिष्ठ संशोधन सहाय्यक डॉ. किरण ओंबासे व डॉ. माधवी शेळके यांनी पुरस्कार स्विकारला. सदर परिषदेत ऊस रोगशास्त्र डॉ. सुरज नलावडे यांना उत्कृष्ट शोध निबंध सादरीकरण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

ऊस बियाणे विक्रीसाठी मागेल त्याला मागेल तेवढे बियाणे या प्रमाणे बियाण्याचा पुरवठा केल्यामुळे गेली 4 वर्षे सातत्याने 50 लाखापेक्षा अधिक दोन डोळ्याची ऊस टिपरी बियाणे वाटप केले. हा या संशोधन केंद्राचा विक्रम आहे. बियाणे बदलामुळे राज्याचे ऊस उत्पादन वाढत आहे. त्यामुळे गेली 2 वर्षे राज्याचे हेक्टरी उत्पादन वाढले असुन चालु वर्षी सरासरी 100 टन हेक्टरी उत्पादन मिळण्याची शक्यता आहे.

या कृषि विद्यापीठांतर्गत असलेले ऊस संशोधन केंद्र, पाडेगांव यांनी विकसीत केलेले उसाचे फुले 265 आणि को 86032 या वाणांनी ऊस क्षेत्रात क्रांती केलेली आहे. या वाणांखाली राज्यात 75 टक्के क्षेत्र लागवडीखाली असून या वाणांनी आतापर्यंत राज्यातील ऊस उत्पादक शेतकर्यांना रु. 1,00,787 कोटी दिले आहे.

कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील

 

या संशोधन केंद्राने फुले 265 या वाणाला पर्यायी वाण म्हणुन फुले ऊस 15012, फुले ऊस 13007 व फुले ऊस 15006 या नवीन वाणांची शिफारस केली आहे. महाराष्ट्रातील साखर उद्योगांच्या भरभराटीत पाडेगाव संशोधन केंद्राचे मोलाचे योगदान आहे. पाडेगांव ऊस संशोधन केंद्र 1932 साली स्थापन झालेले असून ते महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कार्यरत असलेले देशातील महत्वाचे ऊस संशोधन केंद्र आहे.

ऊसाचे अधिक उत्पादन आणि अधिक साखर उतारा देणारे वाण विकसित करणे हा या केंद्राचा मुख्य उद्देश असुन आजपर्यंतच्या 93 वर्षाच्या कार्यकाळात या संशोधन केंद्राने शेतकर्यांसाठी एकुण 17 सुधारीत वाण आणि 4 चाबुककाणी प्रतिबंधक वाण विकसित केलेले आहेत. सुधारीत वाणा बरोबर केंद्राने शेतकर्यांच्या उत्पादन वाढीसाठी एकुण 109 तंत्रज्ञान शिफारशी दिलेल्या असुन या तंत्रज्ञान शिफारशींमुळे शेतकर्यांचे उत्पादन व उत्पन्नात निश्चीत वाढ झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते.

महाराष्ट्राच्या ऊस लागवड खालील 14.37 लाख हेक्टर क्षेत्राचा विचार केला असता 86 टक्के पेक्षा जास्त क्षेत्रावर तसेच देशातील 56 टक्के पेक्षा जास्त क्षेत्रावर पाडेगाव संशोधन केंद्राने प्रसारित केलेल्या वाणांची लागवड झालेली दिसुन येते. पाडेगाव संशोधन केंद्राने देशपातळीवर ऊसाच्या संशोधनात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यामुळे सन 2019 मध्ये या केंद्रास देशपातळीवरील उष्ण कटीबंधातील सात राज्यामधील अखिल भारतीय समन्वीत प्रकल्प अंतर्गत उत्कृष्ट संशोधनाबद्दलचा उत्कृष्ट संशोधन केंद्र पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे.

कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी संशोधन केंद्र आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्याचा मनोदय व्यक्त केला असून महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के तसेच महाराष्ट्रातील अनेक सहकारी व खाजगी कारखान्यांच्या कार्यकारी संचालक आणि ऊस विकास अधिकारी यांनी पाडेगाव संशोधन केंद्राच्या योगदानाला हा पुरस्कार जाहीर झाल्याने आंनद व्यक्त करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button