कोणत्याही क्षेत्राची कार्यक्षमता वाढवायची असेल तर इंजिनीयरशिवाय पर्याय नाही
राहुरी विद्यापीठ : अभियांत्रिकीच्या तंत्रज्ञानामुळे शेतीमध्ये उत्पादन, उत्पादकता, नफा आणि भरभराट प्राप्त होऊ शकते. अभियांत्रिकीमुळे शेतीमधील सर्व गोष्टी सोप्या पध्दतीने करता येवू शकतात. लागवडीपासून काढणीपर्यंतच्या सर्व कामांबरोबरच अभियांत्रिकी तंत्रज्ञान, अपारंपारीक उर्जा स्त्रोत व मुल्यवर्धनाची जोड दिल्यास शेती सहज सुलभ होण्याबरोबरच जास्त फायदेशीर होईल. प्रत्येक क्षेत्रामध्ये अभियांत्रिकी महत्वाची भुमीका बजावते. कोणत्याही क्षेत्राची कार्यक्षमता वाढवायची असेल तर इंजिनीयरशिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे शिक्षण विभागाचे माजी उपमहासंचालक व उपयपूर येथील महाराणा प्रताप कृषि व तंत्रज्ञान विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. एन.एस. राठोड यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठातील जागतिक बँक अर्थसहाय्यित राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्पांतर्गत हवामान अद्ययावत शेती व जल व्यवस्थापनाचे आधुनिक कृषि विज्ञान तंत्रज्ञान प्रकल्पाद्वारे अभियांत्रिकी दिनानिमित्त संवेदनशील जगासाठी अभियांत्रिकीचा नवाचार या विषयावर व्याख्यानाचे आयोजन कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन मार्गदर्शन करतांना डॉ. राठोड बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील उपस्थित होते. याप्रसंगी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी.एस. पाटील, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, कुलसचिव डॉ. विठ्ठल शिर्के व कास्ट प्रकल्पाचे प्रकल्प सहसमन्वयक डॉ. मुकुंद शिंदे उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनात डॉ. राठोड पुढे म्हणाले की देशाच्या एकुण वीज निर्मितीपैकी 35 टक्के वीज ही अपारंपारीक उर्जा स्त्रोताद्वारे तयार होत आहे. हे अभियांत्रिकी तंत्रज्ञानामुळे शक्य झाले आहे. पुढील भविष्य हे कृषि अभियांत्रिकीचे असणार आहे. आजचे कृषि अभियांत्रिकीचे विद्यार्थी हे भविष्यात कृषि अभियांत्रिकीचे राजदूत होतील. आपल्या अध्यक्षीय भाषणात कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील म्हणाले की सध्या कपाशीमध्ये कापूस वेचणीसाठीचे यंत्र विकसीत झाल्यानंतर याचा परिणाम कपाशीचे क्षेत्र वाढण्यामध्ये झाला. यावरुन नवीन तंत्रज्ञान शेतीसाठी किती फायदेशीर आहे हे सिध्द होते.
शेतीमध्ये नैसर्गिक संसाधनांच्या शाश्वत व्यवस्थापनाबरोबर संरक्षीत शेती, आय.ओ.टी. तंत्रज्ञान, सेंन्सर, ड्रोन तंत्रज्ञान, अद्ययावत हवामान केंद्रे याचा वापर केल्यास औषधांबरोबरच खते व पाण्याची बचत होऊन वापराबाबतचे योग्य व्यवस्थापन करता येईल. विद्यापीठाने महाजनकोबरोबर नुकताच सौर उर्जेबाबत सामंजस्य करार केला असून विद्यापीठाच्या 400 एकर खडकाळ जमिनीवर दोन मॅगावॅट वीज निर्मिती होऊन विजेच्या बाबतीत विद्यापीठ स्वयंपूर्ण होणार असल्याचे ते म्हणाले. विद्यापिठाच्या माजी विद्यार्थ्यांनी कृषि अभियांत्रिकी श्रेत्रात केलेल्या ऊल्लेखनिय कामाचा त्यांनी यावेळी ऊल्लेख केला.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. दिलीप पवार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. जान्हवी जोशी यांनी तर आभार डॉ. मुकुंद शिंदे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी विविध विभागांचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.