महाराष्ट्र
ठाकरे साहेब गरिबांच्या जीवाशी खेळायचे कधी थांबणार ?
अहमदनगर जिल्हा ग्रामीण रुग्णालयातील घडलेल्या मृत्यूतांडवाच्या तसेच रूग्णालय प्रशासनाच्या निषेधार्थ आज अप्पर जिल्हाधिकारी सोनाप्पा यमगर यांचे मार्फत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशानुसार निवेदन देण्यात आले आणि त्यांना सवाल करण्यात आला की ठाकरे सरकार गरिबांच्या जीवाशी खेळायचे कधी थांबणार ? गरिबांचे मरण इतके स्वस्त झाले. त्यांची पैशाने भरपाई होईल का ? असा सवाल रिपब्लिकन सेनेचे जिल्हाप्रमुख राजू आढाव यांच्या वतीने करण्यात आला.
पुढे निवेदनात असे म्हटले आहे की यंदाच्या वर्षी जानेवारी मध्ये भंडारा जिल्हा रुग्णालयातील नवजात बालकांचा आगीने होरपळून मृत्यू झाला. एप्रिल मध्ये नाशिक रुग्णालयात 25 रुग्णांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. आणि अहमदनगर जिल्हा रुग्णालयात तर 11 पेक्षा अधिक रुग्णांचा आगीत होरपळून मृत्यू झाला असून 20 रूग्ण अत्यावस्थेत आहेत. इतक्या गंभीर घटना घडल्यानंतर ही राज्याच्या आरोग्य यंत्रणेला जाग येणार का नाही ? अशा दुर्दैवी घटनांमुळे सरकारी रूग्णालयांवरचा विश्वास उडाला असल्याची लोकांची भावना निर्माण झाली आहे.
मोलमजुरी करणार्या सामान्य गरीब मध्यम वर्गीय नागरिकांना खाजगी हॉस्पिटल मध्ये परवडणारे नाही म्हणून त्यांनी सरकारी हॉस्पिटल मध्ये दरवेळी मृत्यूची परिक्षा द्यायची का ? रुग्णालयाची तपासणी आणि फायर ऑडिट आणि मेंटेनन्सच्या नावाखाली दरवर्षी बोकाळणारा लाखो करोडोंचा भ्रष्टाचार यामुळेच आज सरकारी यंत्रणेच्या हलगर्जी कारभाराने निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. पुढे निवेदनात असेही म्हटले आहे की मृत्यूमुखी पडलेल्या रूग्णांना दोन पाच लाख रुपयांच्या मदतीची घोषणा करून त्याची चेष्टा केली जाते. त्यामुळे गरीब मजबूर लोकांचे प्राण परत येणार आहे का ? इत्यादी सवाल करून मागणी केली आहे की वरील भंडारा, नाशिक, अहमदनगर या सर्व घटनांची नैतिक जबाबदारी म्हणून राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा राजीनामा घेऊन मंत्री पदावरून तात्काळ मुक्तता करण्यात यावीझ. ग्रामीण रुग्णालयातील घडलेल्या मृत्यूतांडवास जबाबदार असणाऱ्या रूग्णालय प्रशासनाचे प्रमुख डाॅ सुनिल पोखरणा व इतर प्रशासकीय अधिकारी यांच्यावर भारतीय दंड संहिता मनुष्यवधाचा कलम 304 अ निष्काळजी पणाने हयगयीने बेदकारपणे कृत्य केले म्हणून कलम 336, 337, 338, व जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कलम 166 प्रमाणे गुन्हे दाखल करून यांच्या मालमत्तेची चौकशी करून जप्त करण्यात यावी.मृतांच्या वारसांना प्रत्येकी 50 लाख रूपयांची मदत करावी.
यावेळी रिपब्लिकन सेना अहमदनगर जिल्हाप्रमुख राजू आढाव, जिल्हा उपप्रमुख भरत भांबळ, समीर गायकवाड, जिल्हा संघटक अमजदभाई पठाण, शेवगाव तालुकाप्रमुख वसंत साबळे, राहुरी तालुका युवक प्रमुख विनोद पवार, अंजुमभाई पटेल, बारागाव नांदूर विनोद घाडगे, उपप्रमुख शेवगाव अमोल मकासरे, वांबोरी शहर प्रमुख राजूभाऊ पाटोळे, नगर तालुका प्रमुख भाऊसाहेब तूजारे, शाखाप्रमुख आंत्रे भाऊ पवार, तुळशीराम पवार, संदीप भांबळ, साळवे मामा इ. उपस्थित होते.