ठळक बातम्या

“ही मैत्री विचारांची फाउंडेशन” च्या शेतकरी स्नेहसंमेलन व सन्मान सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद; पद्मश्री पोपटराव पवार यांचे मार्गदर्शन

पंढरपूर | प्रतिनिधी : शेतकऱ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी झटणाऱ्या “ही मैत्री विचारांची फाउंडेशन” या संस्थेच्या वतीने चौथे शेतकरी स्नेहसंमेलन व शेतकरी गुणगौरव समारंभ 21 मे 2025 रोजी पंढरपूर येथे भव्य उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला शेकडो प्रगतिशील शेतकऱ्यांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री पोपटराव पवार होते. प्रमुख पाहुणे म्हणून बीबीसी मराठीचे ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बंगाळे, बायोमी टेक्नॉलॉजीचे सीईओ डॉ. प्रफुल्ल गाडगे, सीझेंटा कंपनीचे डिव्हिजनल मार्केटिंग हेड मुकेश शुक्ला, यूपील कंपनीचे शुगरकेन क्रॉप इंडिया हेड अमोल आंधळे, एस. के. बायोबिझचे मार्केटिंग हेड अभयकुमार म्हस्के, भारत बिट इन्फोकॉनचे सीईओ विशाल पाटील, कृषी विद्यापीठ राहुरीचे प्रतिनिधी राकेश भदाने यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

कार्यक्रमात राज्यातील विविध भागांतून आलेल्या यशस्वी शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. विक्रमी पीक उत्पादन करणारे मार्गदर्शक कालिदास बजबळकर, वांगे पीक मार्गदर्शक मधवानंद चव्हाण व तरुण शेतकरी आयडॉल बालाजी लोहोकरे यांचा विशेष गौरव करण्यात आला.

पद्मश्री पोपटराव पवार यांनी आपल्या भाषणात सांगितले, “शाश्वत शेतीसाठी बिगरराजकीय संघटनांनी पुढे येऊन नेतृत्व करणे गरजेचे आहे. ‘ही मैत्री विचारांची फाउंडेशन’ने हे काम उत्तम रीतीने सुरू केले असून, मी स्वतःही यामध्ये सहभागी होईन. पुढील वर्षी केंद्रीय व राज्य कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीत भव्य मेळाव्याचे आयोजन करण्याचा मानस आहे.”

डॉ. प्रफुल्ल गाडगे यांनी शेतकऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नाचे कौतुक करताना नमूद केले, “या समूहाने धोरण निर्मितीत योगदान देत केंद्र शासनाच्या दरबारीही आपली भूमिका अधोरेखित केली आहे, हे अत्यंत कौतुकास्पद आहे.” या कार्यक्रमाच्या यशासाठी सूरज देशमुख (पंढरपूर), गणेश सलगर (माढा), सुदाम गुंड (दौंड), संजय घोगरे (लोणी प्रवरा), पांडुरंग गागरे (मांडवे पारनेर), मधुकर मोरे (नाशिक) आदी शेतकरी कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.

फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. गीतांजली गुंड, सचिव जगदीश गागरे आणि शेतकरी ग्रुपचे ऍडमिन बाजीराव गागरे यांच्या नेतृत्वाखाली हे कार्य सुरू असून, वर्षभर ऑनलाईन पद्धतीने मोफत मार्गदर्शन करून शेकडो शेतकऱ्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचे उल्लेखनीय कार्य ही संस्था करत आहे. हा कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी एक प्रेरणास्थान ठरला असून, महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीसाठी नवा उत्साह घेऊन आला आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button