अहमदनगर
महात्मा फुले कृषि विद्यापीठात देशाचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न
शेतकरी विद्यापीठाच्या केंद्रस्थानी व विद्यार्थी विद्यापीठाचा गौरव : कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील
राहुरी विद्यापीठ : आज आपण सर्व देशाच्या स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहोत. यावेळी आपल्या देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी ज्यांनी बलिदान केले असे शूर जवान, थोर क्रांतिकारक यांना नमन केले पाहिजे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने या अमृत महोत्सवी वर्षांमध्ये संशोधनाबरोबरच शिक्षण व विस्तारामध्ये उल्लेखनीय असे काम केले आहे.
विद्यापीठाच्या कसबे डिग्रज येथील संशोधन केंद्रात तयार झालेल्या सोयाबीनच्या विविध वाणांचे क्षेत्र देशातील 35 लाख हेक्टर क्षेत्रावर पसरले आहे. विद्यापीठाच्या कांदा बियाण्यांची शेतकऱ्यांमध्ये असलेली मागणी लक्षात घेऊन विद्यापीठाने दहा टनांपर्यंत कांदा बियाण्याचे उत्पादन घेतले. त्याचबरोबर राज्यातील पंधराशेपेक्षा जास्त शेतकरी उत्पादक कंपन्यांना ब्रिडर बियाणे देऊन त्यानंतर तयार होणाऱ्या सर्टिफाइड बियाण्यामुळे लाखो शेतकऱ्यांना त्याचा फायदा झालेला आहे. विद्यापीठाने शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून तयार केलेले उत्कृष्ट तंत्रज्ञान, बी- बियाणे तसेच अवजारे इत्यादी दर्जेदार निविष्ठा पुरविल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होऊन त्यांचा फायदा झालेला आहे.
डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाला ए.आय.सी.टी.ई. ची अधिस्वीकृती मिळाली आहे. कानपूर येथील आय.आय.टी. सोबत नमामि गंगे प्रकल्पासाठी सामंजस्य करार करणारे हे पहिले कृषी विद्यापीठ आहे. शेतकऱ्यांबरोबरच विद्यार्थीही या विद्यापीठाचा सन्मान आहे. विद्यार्थ्यांमधून शास्त्रज्ञ घडावेत, मोठे उद्योजक घडावेत जेणेकरून विद्यापीठाचे नाव मोठे होईल अशी अपेक्षा विद्यापीठांची असते. विद्यार्थ्यांबरोबरच या विद्यापीठांमध्ये काम करणारे शास्त्रज्ञ, प्राध्यापक व कर्मचारी यांनी विद्यापीठाची स्थापना ज्या उद्देशाने झाली तो उद्देश लक्षात घेऊन विद्यापीठाचा नावलौकिक कसा वाढेल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
महात्मा फुले कृषि विद्यापीठात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख, अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, नियंत्रक डॉ. बापूसाहेब भाकरे , विद्यापीठ अभियंता मिलींद ढोके, विशेष कार्य अधिकारी डॉ. महानंद माने, मुख्य शास्त्रज्ञ बियाणे डॉ. आनंद सोळंके, उपकुलसचिव विजय पाटील, सर्व विभाग प्रमुख, सुरक्षा अधिकारी गोरक्ष शेटे उपस्थित होते.
यावेळी कुलगुरुंनी विद्यापीठाने इस्राइल तसेच ऑस्ट्रेलिया या विद्यापीठातील शिक्षण संस्थांबरोबर केलेल्या सामंजस्य करारांचा उल्लेख केला. कृषी पारायण मॉडेल व्हिलेज तसेच शेतकरी आयडॉल या विस्तारात केलेल्या नाविन्यपूर्ण कार्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला. यावेळी एनसीसी अधिकारी डॉ. सुनील फुलसावंगे यांनी परेडचे संचलन केले. सुरक्षा अधिकारी गोरक्ष शेटे यांनी सुत्रसंचालन केले. यावेळी पदयुत्तर महाविद्यालय, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालय, हाळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरामध्ये विद्यार्थी तसेच प्राध्यापक व कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला. स्वातंत्र्य दिनाच्या या कार्यक्रमासाठी विद्यापीठातील सर्व अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.