अहिल्यानगर
पद्मश्रींनी सहकाराचे स्वप्न पाहिल्यामुळेच शेतकरी समृद्ध झाला – के. जी. भालेराव
राहुरी | बाळकृष्ण भोसले – पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांना वाचताना समजून घेण्याची गरज आहे. लोणीच्या माध्यमातून सहकाराची भुरळ संपूर्ण देशाला पडली. पद्मश्रींनी सहकाराचे स्वप्न पाहिल्यामुळेच शेतकरी समृद्ध झाल्याचे मत प्रतिपादन पद्मश्री पुरस्कार विजेते लेखक के. जी.भालेराव यांनी केले.
तालुक्यातील सात्रळ महाविद्यालयात आयोजित पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२२ व्या जयंती समारंभ प्रसंगी श्री. भालेराव प्रमुख तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन ॲड. बाळकृष्ण चोरमले पाटील होते. उपप्राचार्या डॉ. जयश्री सिनगर यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी पुनम लक्ष्मण गागरे व सायली माधव हारदे या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रभाकर डोंगरे म्हणाले, शिक्षणामुळेच सर्वांगीण विकास शक्य आहे. अल्पशिक्षित पद्मश्रींचे देशाच्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान आहे. ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमांतर्गत प्रातिनिधिक स्वरूपात प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी वृंद तसेच विद्यार्थी – विद्यार्थिनींना महाविद्यालयाच्या वतीने ध्वज वितरण करण्यात आले.
महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दीपक घोलप यांनी आभार मानले. डॉ. भाऊसाहेब नवले व प्रा. दीप्ती आगरकर यांनी सूत्रसंचालन केले. वंदे मातरम गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.