पश्चिम महाराष्ट्र
डॉ. कोळसे यांची इंडियन फायटोपॅथॉलॉजीच्या पश्चिम विभाग अध्यक्षपदी निवड
राहुरी विद्यापीठ : इंडियन फायटोपॅथॉलॉजीकल सोसायटी, नवी दिल्ली ही वनस्पती रोगशास्त्रविषयक देशपातळीवरील सर्वात जुनी प्रथितयश व सर्वात मोठी वनस्पती रोगशास्त्र विषयाची शास्त्रीय संस्था आहे. या संस्थेचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. सदर संस्थेची राष्ट्रीय पातळीवर 2023 या वर्षाची कार्यकारी परिषदेची निवडणूक नुकतीच पार पडली.
या निवडणुकीसाठी संस्थेचे देशभरातील वनस्पती रोगशास्त्र विषयातील आजीव सभासद मतदार असतात. या निवडणूकीत डॉ. संजय कोळसे, सहयोगी प्राध्यापक, वनस्पती रोगशास्त्र व अणुजीवशास्त्र विभाग, मफुकृवि, राहुरी यांची झोनल प्रेसीडेंट (पश्चिम विभाग) या पदावर तसेच डॉ. सुदर्शन लटके, सहाय्यक प्राध्यापक, कडधान्य सुधार प्रकल्प, राहुरी यांची झोनल कौन्सिलर (पश्चिम विभाग) या पदावर बिनविरोध निवड झाली. संस्थेच्या म्हैसूर येथे दि. 4 फेब्रुवारी, 2023 रोजी झालेल्या 75 व्या वार्षिक बैठकीत यासंबंधी घोषणा करण्यात आली.
डॉ. कोळसे व डॉ. लटके यांचे वनस्पती रोगशास्त्र या विषयात भरीव योगदान लाभलेले आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांचे संशोधन कार्यासाठी मोलाचे मार्गदर्शन लाभलेले आहे. या प्रसंगी या विषयातील शास्त्रज्ञ डॉ. तानाजी नरुटे, डॉ. चिंतामणी देवकर, डॉ. एस.एस. माने, डॉ. अगंद सूर्यवंशी, डॉ. अपेट व डॉ. मकरंद जोशी यांनी अभिनंदन केले.