कृतज्ञता हाच खरा जगण्याचा युगधर्म झाला पाहिजे – डॉ. बाबुराव उपाध्ये
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : भारतीय संस्कृती ही जगातील एकमेव लोकशाहीयुक्त संस्कृती आहे. जगण्यातील विविधता आणि विचारातील भिन्नता असूनही एकसंघ भारतीयत्व जपले जात आहे, त्यामध्ये कौटुंबिक आणि सामाजिक कृतज्ञता ही संस्कृतीची अमृतसंजीवनी आहे, त्यासाठी आज कृतज्ञता हाच खरा जगण्याचा धर्म झाला पाहिजे, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे माजी मॅनेजिंग कौन्सिल सदस्य व जेष्ठ ग्रामीण साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी केले.
शिरसगाव परिसरातील श्रीरामपूर येथील माऊली वृद्धाश्रमात रयत शिक्षण संस्थेतून सेवानिवृत्त झालेले शिक्षक कचरू बाबुराव निकम आणि सौ. ताराताई कचरू निकम यांचा निकम परिवारातील मुले, सुना यांच्यातर्फे कृतज्ञता सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी डॉ. बाबुराव उपाध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी जेष्ठ नागरिक आनंद मेळाव्याचे अध्यक्ष लक्ष्मणराव निकम होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून माजी प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे, पत्रकार राजेंद्र देसाई, माऊली वृद्धाश्रमाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष वाघुंडे आदींसह मान्यवर उपस्थित होते.
प्रथम निकम परिवाराने श्रीविठ्ठल रुक्मिणी मूर्तीचे पूजन केले. प्रशांत निकम, सौ.आरती निकम, श्रीकांत निकम व सौ. अश्विनी निकम यांनी कचरू निकम व सौ. ताराताई निकम यांचा पुष्पहार, भेटवस्तू, पुस्तक देऊन कृतज्ञतायुक्त सत्कार केला. सुभाष वाघुंडे यांनी माऊली वृद्धाश्रमाचा 2017 पासूनच खडतर प्रवास सांगून वृद्धाश्रमात निकम परिवाराने असा सोहळा आयोजित केल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
कृतज्ञता संस्कृती वाढली तर वृद्धाश्रमाची गरज भासणार नाही, असे त्यांनी सांगितले. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी कुटुंब हे सेवाभावाचे देवालय आहे. मातृपितृ देवोभव ही आपली संस्कृती आहे, ती कृतज्ञतेच्या पायावर उभी आहे. युद्धमुक्त जग हवे असेल तर कृतज्ञता हाच खरा युगधर्म झाला पाहिजे, आई, वडील हॆच दैवत मानून वागले पाहिजे.
डॉ उपाध्ये यांनी कौतुक करून मुले, सुना, मुली, जावई यांच्या आयोजनाबद्दल पुस्तके देऊन सत्कार केले. यावेळी प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे, कवी, पत्रकार राजेंद्र देसाई, नितीन तुकाराम राऊत, सौ. उर्मिला अशोक आदमाने, सौ. प्रमिला लक्ष्मणराव काळे, सौ. शिल्पा प्रकाशराव जाधव, श्रीकांत निकम, बाळकिसन निकम यांनी मनोगत व्यक्त केले.
लक्ष्मणराव निकम यांनी अध्यक्षीय मनोगतात सांगितले की, कचरू निकम यांची रयत शिक्षण संस्थेत विविध शाखेत बदल्या झाल्या. परंतु प्रत्येक शाखेत त्यांनी प्रामाणिकपणे नोकरी केली. कधी तक्रार केली नाही, सौ. ताराताई यांनी निकमसरांना खूप कष्ट सोसत साथ दिली. त्यांची मुले, सुना, मुली, जावई, नातवंडे समजूतदार आणि बुद्धिमान आहेत. चांगले केल्याचे फळ नेहमी चांगलेच मिळते, हा सोहळा वृद्धाश्रमात आयोजित करून त्यांनी कृतज्ञतेचा खरा आदर्श सांगितला आहे, असे सांगून निकम पतिपत्नीचा सन्मान केला.
कचरू निकम यांनी आपल्या मनोगतातून आपल्या परिवाराचे, स्नेहीजणांचे कौतुक केले. स्वाध्याय परिवारामुळे कुटुंब संस्कार मिळाले, रयतमध्ये आदर्श सेवाभावी सहकारी लाभले, पत्नीची आदर्श सोबत आणि अपत्यांचे आदर्श वागणे हेच माझ्या समाधानी जीवनाचे सूत्र असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन प्रशांत निकम यांनी केले तर सौ. ताराताई निकम यांनी आभार मानले.