कृषी
राहुरी कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञ व विद्यार्थ्यांची रावळगाव येथील पवार बंधुंच्या प्रक्षेत्रास भेट
राहुरी विद्यापीठ : राष्ट्रीय उच्च शिक्षण प्रकल्प व भारतीय कृषि अनुसंधान परीषद यांच्या संयुक्त विद्यमाने हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषि विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र महात्मा फुले कृषि विद्यापीठामध्ये कार्यरत असून या प्रकल्पाअतंर्गत आधुनिक शेती तंत्रज्ञान पध्दतीचा वापर करण्यार्या शेतकर्यांच्या प्रक्षेत्रास महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी येथील शास्त्रज्ञ आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी भेट दिली. या अभ्यास दौर्याचे आयोजन प्रमुख संशोधक डॉ. सुनिल गोरंटीवार, सहसंशोधक डॉ.मुकुंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
या प्रकल्पाअंतर्गत आधुनिक शेती तंत्रज्ञान पध्दतीचा अभ्यास करण्याकरीता एक दिवसीय अभ्यास दौर्याचे आयोजन करण्यात आले होते. या अनुषंगाने नाशिक जिल्हयातील, मालेगाव तालुक्यातील रावळगांव येथील प्रगतशील शेतकरी रवी पवार यांच्या प्रयोगशील शेतीस संबंधीतांनी भेट दिली. त्यांनी एकूण 86 एकर प्रक्षेत्रावर आधुनिक तंत्रज्ञान शेती पध्दतीचा वापर करुन डाळिंब आणि शेवगा पिकांची लागवड केलेली आहे. यामध्ये प्रामुख्याने यांत्रिकीकरणावर भर दिला आहे, त्यामुळे शेत मजूरा वरील खर्चाची बचत होते. यामध्ये मातीतील ओलावा मोजण्यासाठी सेन्सर, प्रकाशमापक, स्लरी युनिट, स्वयंचलित भरणी यंत्र, ठिंबक सिंचन पध्दती जमिनीपासून 2.5 फूट उंचावर बसविण्यात आलेली आहे, इत्यादी आधुनिक शेती पध्दतीचा वापर करुन डाळिंब आणि शेवगा पिकाचे विक्रमी उत्पादन घेतात.
यावेळी शास्त्रज्ञ व सर्व विद्यार्थ्यांनी महेश पवार यांच्या शेवगा शेतीस भेट दिली. त्यांच्याकडून शेवगा उत्पादन तंत्रज्ञान पैलुंची माहिती घेण्यात आली. यात प्रामुख्याने, शेवगा बियाणे निवड, खत व्यवस्थापन, लागवड अंतर, वाण व स्वत: बनवत असलेल्या गांडुळ खताचा वापर या विषयी सखोल चर्चा करण्यात आली. शेवगा उत्पादनामध्ये बहार व्यवस्थापन ही महत्वाची बाब असल्याचे पवार यांनी मत व्यक्त केले. या सर्व आधुनिक शेती पध्दतीचा विद्यार्थ्यांना फायदा होईल. तसेच सर्व शास्त्रज्ञ व विद्यार्थीनी कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, काष्टी, मालेगाव येथे भेट दिली. या भेटीदरम्यान डॉ. मुकुंद शिंदे, सहसंशोधक, कास्ट प्रकल्प यांनी कास्ट प्रकल्पाबद्दल तसेच डिजीटल ॲग्रीक्लचर बद्दल त्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या अभ्यास दौर्यात काष्टी महाविद्यालयाचे नोडल अधिकारी डॉ. विश्वनाथ शिंदे, एकूण 15 शास्त्रज्ञ, व पदव्युत्तर महाविदयालय राहुरीचे 19 तसेच कृषि व्यवसाय आणि व्यवस्थापन काष्टी महाविद्यालयाचे 18 विद्यार्थी सहभागी झाले होते.