श्रीरामपूर जेष्ठ नागरिक आनंद मेळावा सदस्यांनी मानवता जपली- प्राचार्य अनारसे
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : ‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे’ हे तत्व साने गुरुजींनी महाराष्ट्रभर बिंबवले. याचाच प्रत्यय श्रीरामपूरातील अठरापगड जातीधर्मातील जेष्ठ नागरिक आनंद मेळाव्यातील सदस्यांनी समाजापुढे ठेवला, त्याच्यांतील मानवातील माणुसकीचा अविष्कार दिसून आला असे उद्गार आनंद मेळाव्याचे माजी अध्यक्ष प्राचार्य शंकरराव अनारसे यांनी काढले.
श्रीरामपूर जेष्ठ नागरिक आनंद मेळाव्याचे अध्यक्ष लक्ष्मणराव निकम यांच्या कार्यकुशल नेतृत्वाखाली नुकतीच जेष्ठ नागरिकांची सहल अधिक श्रावण मासानिमीत्त पंढरपूर येथे विठ्ठल रखुमाई दर्शनासाठी काढण्यात आली. त्यात बावन्न जेष्ठ नागरिक होते. त्यामध्ये बावीस महिलांनी सहभाग नोंदवला. साठ ते पंच्याएंशी वर्ष वय असलेले जेष्ठ नागरिक स्त्री-पुरूष होते. आरामदायी प्रवास व्हावा म्हणून लक्झरी बसचे आयोजन केले.
पंढरपूरला जातानी-येतानी जेष्ठ नागरिकांत समतेचा, सदभावनेचा आणि एकमेकांतील जिव्हाळ्याचा आविष्कार दिसून आल्याचे प्राचार्य शंकरराव अनारसे म्हणाले. ३०० कि. मि. च्या प्रवासात भक्तीगीते, हिंदीगीते, भावगीते हे अनेकजणांनी त्यांच्या गोड आवाजात गायली. सगळ्यांना मंत्रमुग्ध केले. त्यात बहुतांशी महिला भगिनींचा सहभाग होता. विशेषतः बोबडे यांनी या आनंदमय गाण्यांचे नियोजन केले. त्यांनी त्यांच्या गोड आवाजात हिंदी गाण्यांची मेजवानी दिली. त्यांनी अनेकांना प्रश्न विचारून मुलाखती घेतल्या. हा उत्साह इतका आनंददायी होता की, तरूणांना लाजवेल अशाप्रकारे एकत्रित आनंद घेत होते. प्रवासाच्या कालावधीत चहा, नाष्टा, जेवण याची उत्तम सोय अध्यक्ष निकम आणि इतर संयोजकांनी केली होती.
जेष्ठ नागरिकांनी कसे जगावे, कसा आनंद घ्यावा याचे प्रत्यक्ष उदाहरण कालच्या सहलीतून दिसून आले. त्यातूनच माणसातील माणुसकीचे दर्शन झाल्याचे अनुभवले. विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक सचिव सुखदेव सुकळे यांनी ग्रंथ भेट दिला, तसेच त्यांनी श्री बोबडे यांच्या विशेष नियोजनबद्दल ग्रंथ भेट देऊन सत्कार केला. तसेच दौंड येथे भोजनप्रसंगी संभाजी टिंगरे व मुन्नाभाई सय्यद यांचा ग्रंथ भेट देऊन सत्कार केला. ही जेष्ठ नागरिकांची सहल म्हणजे यशस्वी जीवन जगण्यासाठी उर्जा असल्याचे निकम यांनी उद्गार काढले.