गुन्हे वार्ता

नाथ निकेतन काॅलनीत कामगारांचे घर फोडले; ९५ हजारांचा ऐवज लंपास

विलास लाटे | पैठण : एका कामगाराचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी कपाटात ठेवलेले लॅपटॉप, नगदी १५ हजार रुपये व दागिने असा एकूण ९५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना शनिवारी (दि.१) रात्री पिंपळवाडी परीसरातील नाथ निकेतन काॅलनीत घडली. याप्रकरणी पैठण एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पिंपळवाडी परीसरातील नाथ निकेतन काॅलनीत प्रविण पुंडलिक पडुळ यांचे घर आहे. येथे ते कुटुंबासह राहतात. १ ऑक्टोबर रोजी मुलगा, पत्नी व मुलगी हे मुळगावी लाडसांवगी येथे शेतीच्या कामासाठी गेले होते ते दुसऱ्या दिवशी परतले. तर प्रविण पडूळ हे ही एका खासगी कंपनीत रात्रपाळीला गेले होते. रात्री घरी कोणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घराची झडती घेतली.
घरातील कपाटात ठेवलेला लॅपटॉप, कोठीतून दागिने ठेवलेला डबा व किचनमध्ये शेंगदाण्याच्या डब्यात ठेवलेले नगदी १५ हजार रुपये असा ९५ हजार रुपयांचा ऐवज घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. प्रविण पडुळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध पैठण एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलिस पुढील तपास करत आहेत.

Related Articles

Back to top button