कृषी
ज्वारी मुल्यवर्धनातून शेतकर्यांची उन्नती शक्य – विभाग प्रमुख डॉ. उत्तम चव्हाण
शेतकरी प्रथम प्रकल्पांतर्गत रब्बी ज्वारी उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण वर्ग संपन्न
राहुरी विद्यापीठ : माल पिकतो तो विकला पाहिजे यासाठी तंत्रज्ञान गरजेचं आहे. ज्वारीमध्ये मुल्यवर्धन खुप गरजेचं आहे. ज्वारीवर प्रक्रिया करून ज्वारीची किंमत जास्त पटीने मिळते. ज्वारीमध्ये असणार्या विविध घटकांमुळे विविध आजारांपासून सूटका होते. अन्न हे औषध म्हणुन खावे औषध अन्न म्हणुन खाऊ नये. ज्वारी मुल्यवर्धनातुन शेतकर्यांची उन्नती शक्य असे प्रतिपादन अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. उत्तम चव्हाण यांनी केले.
आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष-2023 या अंतर्गत भारतीय कृृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्लीच्या शेतकरी प्रथम प्रकल्प व ज्वारी सुधार प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने रब्बी ज्वारी उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर एकदिवसीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन ज्वारी सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृृषि विद्यापीठ, राहुरी या ठिकाणी करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानावरुन डॉ. उत्तम चव्हाण बोलत होते. यावेळी शेतकरी प्रथम प्रकल्पाचे प्रमुख अन्वेषक व प्रसारण केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. पंडित खर्डे, वरिष्ठ ज्वारी पैदासकार डॉ. दीपक दुधाडे, कीटकशास्त्रज्ञ डॉ. उत्तम कदम, प्रा. सुदाम निर्मळ, डॉ. उदयकुमार दळवी, डॉ. जे.एम. पाटील, प्रकल्पाचे सहसमन्वयक डॉ. सचिन सदाफळ, डॉ. भगवान देशमुख, तांभेरे, कानडगाव, चिंचविहिरे व कनगर गावातील ज्वारी उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक डॉ. पंडित खर्डे यांनी केले. डॉ. दीपक दुधाडे यांनी कोरडवाहू रब्बी ज्वारीचे तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन केले. यामध्ये रब्बी ज्वारीची पंचसूत्री जसे की मूलस्थानी पाणी व्यवस्थापन, जमिनीच्या प्रकारानुसार वाणांची निवड, ओलावा व्यवस्थापन, एकात्मिक अन्यद्रव्य व्यवस्थापन व एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन याचा समावेश आहे. तसेच त्यांनी विद्यापीठाने विकसित केलेल्या वाणांची वैशिष्ट्ये, पेरणीची वेळ, बीजप्रक्रिया व बियाण्यांचे प्रमाण, खतांची मात्रा इत्यादी विषयी मार्गदर्शन केले. डॉ. उत्तम कदम यांनी ज्वारीवरील विविध किडींविषयी शेतकर्यांना मार्गदर्शन केले. ज्यामध्ये खोड कीड, खोड माशी, मावा, तुडतुडे व कोळी इत्यादी किडींच्यामुळे होणारे नुकसान व त्यावरील उपाययोजना याविषयी मार्गदर्शन केले.
डॉ. उदयकुमार दळवी यांनी आरोग्याच्या दृष्टीने ज्वारीचे महत्त्व समजावून सांगितले. ज्वारीमधील विविध घटक व त्यांचे मानवी शरीराला होणारे फायदे या विषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. भगवान देशमुख व आभार प्रदर्शन डॉ. सचिन सदाफळ यांनी केले. कार्यक्रमासाठी चिंचविहिरे, कनगर, तांभेरे व कानडगाव येथून पन्नासपेक्षा जास्त शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय शेडगे, किरण मगर व राहुल कोर्हाळे यांनी परिश्रम घेतले.