अहिल्यानगर
महिलांनी समस्यांचा पाढा न वाचता प्रसंगावधान राखून मात करावी – सौ. रूपाली लोंढे
राहुरी | बाळकृष्ण भोसले : वाढत्या इंटरनेटच्या वापरांमुळे लोकांचे आयुष्य अधिक सोपे झाले आहे. पण, सोबतच यामुळे अनेक अडचणी देखील वाढल्या आहेत. अनेकदा नागरिक नकळत सायबर क्राईमला बळी पडतात. याकरिता योग्य मार्गदर्शन आणि समुपदेशन होणे गरजेचे आहे. महिलांनी स्वतःचे आर्थिक नियोजन करावे. आत्मनिर्भर होण्यासाठी व्यवसाय करत असताना समस्यांचा पाढा न वाचता प्रसंगावधान राखून त्यावर मात करावी, असे प्रतिपादन जनसेवा फाउंडेशनच्या प्रकल्प अधिकारी सौ. रूपाली लोंढे यांनी केले.
पद्मभुषण लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या तालुक्यातील सात्रळ येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील महिला सबलीकरण कक्ष आणि आरोग्य समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महाविद्यालयीन विद्यार्थिनींचे आरोग्य व समस्या’ या विषयावर सौ. लोंढे महिला सबलीकरण कक्षाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. (डॉ.) प्रभाकर डोंगरे होते.
सौ. लोंढे पुढे बोलताना म्हणाल्या, विविध आर्थिक साधने वापरून भविष्यामध्ये येणाऱ्या मोठ्या खर्चाची खात्रीशीर तरतूद, त्याच बरोबर ठराविक वयानंतर आर्थिक स्वातंत्र्य मिळवून काम न करता केलेल्या गुंतवणुकीच्या परताव्यावर समृद्धसुखी आयुष्य जगणे म्हणजे आर्थिक नियोजन होय. उपप्राचार्या डॉ. जयश्री सिनगर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून अतिथींचा परिचय करून दिला सूत्रसंचालन प्रा. लतिका पंडुरे यांनी केले. प्रा. अश्विनी साळुंके यांनी आभार मानले. कार्यक्रमास विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.