अहिल्यानगर
स्थगिती सरकारच्या निषेधार्थ सायकल रॅली – आ. तनपुरे, सायकलवरून स्थगित कामांना भेटी
राहुरी | बाळकृष्ण भोसले : महाविकास आघाडी सरकारने राहुरी नगर पाथर्डी या विधानसभा मतदार संघातील विविध विकास कामांना निधी उपलब्ध करून दिला होता. अनेक कामांचे टेंडरही निघालेले होते. मात्र कटकारस्थान करून शिंदे फडणवीस सरकार राज्यात आले. या विद्यमान सरकारने मागील आघाडी सरकारच्या काळातील सर्वच कामांना स्थगिती दिल्याने विकास कामे रखडली आहेत. याचा सर्वाधिक मोठा फटका सर्वसामान्य जनतेला बसला आहे. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी स्थगित झालेल्या कामाच्या ठिकाणी सायकलवर जाऊन निषेध रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती माजी राज्यमंत्री व विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिली.
दि २० ते २१ ऑक्टोबर असे २ दिवस सायकल रॅली काढली जाणार आहे. या निषेध रॅलीत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहनही आमदार तनपुरे यांनी केले आहे. अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, दि २० ऑक्टोबर रोजी गुरुवारी बारागाव नांदूर येथे सकाळी ८ वाजून ३० मिनिटांनी बाजार तळ येथे निषेध सभा आयोजित केली आहे तर मल्हारवाडी येथे दुपारी १२ वाजता सभा होणार आहे. तसेच दुपारी २ वाजता घोरपडवाडी येथे निषेध सभा होईल शुक्रवार दि २१ सप्टेंबर रोजी बाभुळगाव येथे सकाळी ८ वाजून ३० मिनिटांनी खडांबे येथे दुपारी १२ वाजता तमनर आखाडा येथे दुपारी ३ वाजता निषेध सभा पार पडेल. गेल्या अनेक वर्षापासून महत्त्वाचे वरदळीचे रस्ते तसेच पडून होते. नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन या रस्त्यांचे खडीकरण डांबरीकरण कामासाठी निधी मंजूर झालेला होता. मात्र स्थगिती दिल्याने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सायकल रॅली काढून निषेध केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.