अहिल्यानगर
अहमदनगर येथे प्रथमच लेदर प्राँडक्ट प्रशिक्षण
अहमदनगर : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, (MCED) अहमदनगर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे तसेच रविदासिया चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांच्या सयुक्त विद्यमाने जिल्हा उद्योग केंद्र अहमदनगर यांच्या पुढाकाराने विशेष घटक योजने अंतर्गत अहमदनगर शहरात ३० दिवसीय लेदर प्राँडक्ट प्रशिक्षणाचा आज शुभारंभ झाला.
प्रशिक्षणाचे उद्घाटन रविदासिया चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे संचालक संजय खामकर यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी तात्यासाहेब जिवडे यांनी प्रशिक्षणार्थींना उद्योग-व्यवसाय प्रशिक्षण, उद्योग-व्यवसाय उभारणी, ब्रँडिंग, उत्पादन ते विक्री व्यवस्था (बाजारपेठ ) जिल्हा उद्योग केंद्र, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र व शासनाचे उद्योग-व्यवसाया संबंधित विविध विभाग व प्रकल्पांच्या माध्यमातून शासन सहाय्य व बँकांकडून होणारा वित्तीय पुरवठा या संदर्भात माहिती दिली.
अनुसूचित जाती मागासवर्गीय युवकांना उद्योग-व्यवसायाकडे आकर्षित करून त्यांना विविध उद्योग-व्यवसायांचे प्रशिक्षण देऊन तरुणांना स्वावलंबी, स्वयंपूर्ण करून त्यांचे जीवनमान उंचावून राष्ट्र उभारणीच्या कार्यात त्यांचे योगदान वाढावे या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था ( बार्टी ) पुणे शासनाची स्वायत्त संस्था कार्य करीत आहे. बार्टीचे प्रकल्प अधिकारी दिलावर सय्यद यांनी RCCI चे संचालक संजय खामकर यांच्या प्रयत्नाने जिल्हा उद्योग केंद्र, अहमदनगर, तसेच महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, अहमदनगर यांनी लेदर प्रॉडक्ट प्रशिक्षण महाराष्ट्रात प्रथमच विशेष बाब म्हणुन समाविष्ट करण्यात आल्याचे सांगितले. महाराष्ट्रातील पहिल्याच विनाशुल्क शिबीराचा अहमदनगर येथे शुभारंभ झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील ३० प्रशिक्षणार्थींची निवड करण्यात आली आहे. विषेशत: महिलांचा सहभाग उल्लेखनीय आहे. करियर काँउंसलर दिनेश देवरे यांनी नोकरी मिळविण्याच्या या भयावह काळात उत्पनाचे साधन म्हणून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी व आपली सर्वोच स्वप्न पूर्ण करण्यासाठी तरुणांनी आपले उद्योग-व्यवसायाशी संबंधित कौशल्य वाढवून उद्योग-व्यवसायाकडे वळावे ती काळाची गरज आहे असे पटवून दिले.
यावेळी संजय खामकर बोलताना म्हणाले की, अनु. जाती, मागासवर्गीय समाज उद्योग-व्यवसायामध्ये खूपच मागे राहिलेला आहे किंवा जे कोणी उद्योग-व्यवसाय करतात ते परंपरागत पद्धतीने करतात. त्यांच्या लघु व मध्यम उद्योग-व्यवसायांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध सबसिडी असलेल्या उद्योग व्यवसायाच्या योजना, तांत्रिक प्रशिक्षण घेवुन राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बाजारात आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दर्जेदार उत्पादन ब्रँडेड कसे करता येईल अशा सकारात्मक विचारातुन आता पुढे येणे गरजेचे आहे असे नमूद केले .राष्ट्रीय स्तरावर रजिस्टर असलेली रविदासिया चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री संस्था युवकांना सर्वोच प्लॅटफॉर्म मिळवुन देण्यासाठी कटिबध्द असल्याचे सांगितले. नविन व्यावसायिक व उद्योजकांना आपला व्यवसाय-उद्योग उभारण्यासाठी सर्व प्रकारची संधी, मदत, RCCI च्या माध्यमातून दिली जाईल. मग ते शासनाच्या विविध योजना, प्रशिक्षण, कार्यशाळा, शिबीर, बँकांच्या वित्त पुरवठा संबंधित बाबी, प्रशिक्षणार्थीसाठी औद्योगिक सहली, प्रशिक्षण देण्यासाठी तज्ञ प्रशिक्षक या सर्व गोष्टींचे आयोजन, नियोजन RCCI च्या माध्यमातून केले जाईल असे सांगितले.
आजच्या या महिनाभराच्या लेदर प्रॉडक्ट प्रशिक्षणात विविध प्रकारचे लेदर प्रॉडक्ट प्रशिक्षणार्थींना शिकविले जातील व त्यासाठी ५ ते ६ तज्ञ राज्यातील विविध भागातून निमंत्रीत केले असुन याचा लाभ प्रशिक्षणार्थींना यशस्वी होण्यासाठी निश्चितपणे मिळेल असे नमूद केले. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन RCCI चे संचालक संदीप सोनवणे यांनी केले. या प्रसंगी कोपरगाव येथील लेदर प्रॉडक्ट उद्योजक व प्रशिक्षक विशाल पोटे, वधुवर समितीचे कोषाध्यक्ष अरुण गाडेकर उपस्थित होते. बार्टी च्या नगर तालुका समतादूत श्रीमती प्रेरणा विधाते यांनी आभार मानले.