छत्रपती संभाजीनगर
ढोरकीनसह परीसरात पोळा सण उत्साहात साजरा
विलास लाटे | पैठण : मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे अतिशय साध्या पद्धतीने साजरा होणारा पोळा सण यावर्षी कोरोनाचे निर्बंध उठवल्यामुळे ढोरकीनसह परिसरातील टाकळी, धनगाव, बोरगाव आदी गावात शुक्रवारी (दि.२६) बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. गावागावात बैलांच्या वाजतगाजत मिरवणुका काढण्यात आल्या.
शुक्रवारी असलेल्या बैलपोळा सणानिमित्त गेल्या दोन-तीन दिवसांपासून परिसरातील शेतकऱ्यांनी घरची सर्व जनावरे स्वच्छ पाण्याने धुवून आदल्या दिवशी बैलांच्या खांद्याला हळद लावून खांदेमळणी केली. दुस-या दिवशी म्हणजेच बैल पोळ्याच्या दिवशी बैलांना पुन्हा आंघोळ घालून स्वच्छ करुन त्यांच्या अंगावर रेशमी झूल, गळ्यात घुंगराची माळ, घंटा, अंगावर रंगबेरंगी चित्रे, शिंगांना रंग देऊन त्यावर फुगे आणि तुरे लावण्यात आली होती. दुपारनंतर घरापासून वाजत गाजत मिरवत नेऊन ग्रामदैवताचे दर्शन घेऊन परत घरी आणून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालून पूजा करण्यात आली. यावर्षी समाधानकारक पाऊस असल्यामुळे बळीराजाने हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला.
मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या सावटाखाली हा सण अतिशय साध्या पद्धतीने साजरा केला जात होता. यावर्षी कोरोनाचे निर्बंध उठल्यामुळे व चांगल्या पावसामुळे हा सण उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आल्याचे चित्र दिसत होते.