छत्रपती संभाजीनगर
सिल्लोड येथील कृषि प्रदर्शनात मफुकृविच्या दालनास शेतकर्यांचा प्रचंड प्रतिसाद
राहुरी विद्यापीठ : औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथे दि. 1 जानेवारी, 2023 पासून सुरु झालेल्या कृषि महोत्सवानिमित्त भरविण्यात आलेल्या कृषि प्रदर्शनात राहुरीच्या महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या प्रदर्शन दालनास शेतकर्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व विस्तार शिक्षण संचालक डॉ. तानाजी नरुटे, संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार यांच्या नेतृत्वाखाली हे प्रदर्शन दालन उभारण्यात आले आहे.
यामध्ये विस्तार शिक्षण संचालनालय, राष्ट्रीय बियाणे प्रकल्पाचा बियाणे विभाग, उद्यानविद्या विभाग, वनस्पती शास्त्र विभाग, कृषि विद्या विभाग, कास्ट प्रकल्प, देशी गाय संशोधन प्रकल्प, जलसिंचन व निचरा अभियांत्रिकी विभाग, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, कृषि किटकशास्त्र विभाग, वनस्पती रोगशास्त्र व कृषि अणुजीवशास्त्र विभाग, मृदविज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभाग, कृषि अर्थशास्त्र विभाग, आंतरविद्याशाखा व जलसिंचन विभाग, कृषि अवजारे विभाग, कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ, धुळे व जळगांव या केंद्रांचा यामध्ये समावेश आहे.
ड्रोनद्वारे शेतावरील औषध फवारणीचा विषय देशभरात चर्चिला जात असल्यामुळे कास्ट प्रकल्पाद्वारे ड्रोनच्या सहाय्याने केलेल्या औषध फवारणीच्या प्रात्यक्षिक पाहण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणावर गर्दी करीत असल्याचे दिसले. प्रदर्शन दालनास भेट देणार्या शेतकर्यांच्या संखेत वाढ होत असून राहुरी कृषि विद्यापीठाचे हे प्रदर्शनाचे दालन शेतकरी बांधवांची पहिली पसंती असल्याचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. तानाजी नरुटे यांनी सांगितले.