अहमदनगर
कृषी विद्यापीठात अग्नीवीर भरतीसाठी आलेल्यायुवकांची आ. तनपुरेंनी केली खाणपाण व्यवस्था
राहुरी | बाळकृष्ण भोसले – महात्मा कृषी विद्यापीठ परिसरात भारतीय सैन्य दलातर्फे अग्निवीर भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी राज्यभरातून हजारो युवक येथे पोहोचले आहेत. या सर्वांना मोफत जेवण्याची व्यवस्था राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमदार प्राजक्त तनपुरे यांच्याकडून करण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष संतोष आघाव व युवक तालुका अध्यक्ष धिरज पानसंबळ यांनी दिली.
अग्निवीर भरतीसाठी केंद्र सरकारच्या संरक्षण विभागाचे वतीने २४ ऑगस्ट २०२२ पासून भरती प्रक्रिया सुरु झाली असून सदर भरती १९ सप्टेंबर २०२२ पर्यंत असून या भरती प्रक्रियेसाठी राज्यभरातून हजारो युवक येत आहेत. या सर्वांना राहण्याची जेवण्याची सुविधा कृषी विद्यापीठ उपलब्ध करून देऊ शकत नसल्याने त्या युवकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी राहुरी नगर पाथर्डीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांचे वतीने जेवणाची सोय भरती प्रक्रियेच्या ठिकाणी जागेवर करण्यात येणार असून बरोबर मोफत स्वच्छ गार पाणी देण्यात येणार आहे. पाण्याची एक मोबाईल व्हॅन ठेवण्यात आले असून सदर पाणी १ रुपया लिटर प्रमाणे पुरविण्यात येणार आहे. तसेच तनपुरे यांनी भरती प्रक्रियेस येणाऱ्या युवकांची राहण्याची मोफत व्यवस्था राहुरी शहरातील केशर मंगल कार्यालयात करण्यात आली असून तिथे सर्व व्यवस्था करण्यात आली आहे.
अग्निवीर भरती आलेल्या युवकांची जेवण राहाणे या कामाचे नियोजनाची जबाबदारी आमदार प्राजक्त तनपुरे व युवा नेते हर्ष तनपुरे यांचे मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक नंदकुमार तनपुरे, गजानन सातभाई, शहाजी जाधव, महेश उदावंत, गौरव तनपुरे, प्रवीण कदम, कैलास शेटे सर, मदन तनपुरे आदि करीत आहे.