अहिल्यानगर
गिन्नी गवतापासून इंधननिर्मिती प्रकल्प ग्रामविकासाला गती देईल : अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. दीपाली काळे
श्रीरामपूर ( बाबासाहेब चेडे ) : आम्ही स्वतः शेतकरी कुटुंबातील आहोत, कोल्हापूर भागात शेती आहे, श्रीरामपूर तालुक्यातील डॉ. बबनराव आदिक यांच्या शेतशिवारात गिन्नी गवतापासून इंधन निर्मितीप्रकल्प सुरु होत आहे, हे कौतुकास्पद असून अशा बायो इंधन प्रकल्पामुळे गावविकासाला गती प्राप्त होईल, असे मत अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपालीताई काळे यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर जीतशार प्रोड्युसर कंपनी प्रा.लि., शकुंतला क्लिनफ्लुल्स प्रायव्हेट लिमिटेड व एम. सी.एल. मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु होणाऱ्या गिन्नी गवतापासून इंधननिर्मिती प्रकल्प माहिती पुस्तिका आणि निवेदन कंपनी संस्थापक, अध्यक्ष रंजीत दातीर यांच्याकडून स्वीकारल्यानंतर अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. दीपालीताई काळे बोलत होत्या. प्रारंभी डॉ. बबनराव आदिक यांनी स्वागत, प्रास्ताविकातून शेती, शेतकरी आणि गावविकासाला पूरक ठरणाऱ्या बायो इंधन प्रकल्पाची माहिती दिली तर रंजीत दातीर यांनी सविस्तर विवेचन केले. दातीर म्हणाले, तालुक्यात स्वच्छ इंधन बायोफ्युएल व कॅन्सर मुक्त केमिकल मुक्त सेंद्रिय शेती या दोन क्षेत्राचा विकास करणार आहोत. खेड्यात 2000रोजगार निर्मिती आणि प्रत्येक कुटूंबाचे पाच ते दहा हजार रुपये उत्पन्न वाढणार आहे. प्रकल्पाची क्षमता प्रतिदिनी एक लाख किलोग्रॅम इतकी आहे. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन एमसीएलचे शाम शिवाजी घोलप यांनी ही योजना सुरु केली, ती आमचीही प्रेरणा आहेअसे सांगून गिन्नी गवत आणि शेतकरी अर्थकारण फायदे सांगितले. डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी संत संस्कृतीची ज्योत आणि आयुष्याच्या वळणावर ही दोन पुस्तके देऊन डॉ. दीपालीताई काळे यांचा सत्कार केला व चर्चेत भाग घेतला. डॉ. दीपालीताई काळे यांना बायो इंधननिर्मिती ही शेतकरीहिताची, गावविकासासाची योजना असल्याबद्दल समाधान वाटले, गिन्नी गवत आणि त्यापासून होणारे आर्थिक फायदे याविषयी रंजीत दातीर यांच्याशी डॉ.दीपालीताई काळे यांनी उत्साहपूर्वक चर्चा केली. नायगावचे सरपंच डॉ. राणा राशीनकर, राजेंद्र येळवंडे, बाळासाहेब बनकर, बाळासाहेब पटारे, रोहिदास लांडे आदी उपस्थित होते. यावेळी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी विशेष सहकार्य केले याबद्दल राजेंद्र येळवंडे यांनी सर्वांचे आभार मानले.