अहिल्यानगर
महाराष्ट्र शासनाने डॉ विशाखा शिंदे वरील सर्व गुन्हे मागे घेवून तिला दोषमुक्त करावे- देवळाली हेल्प टीम
अहमदनगर/जावेद शेख : न्यायव्यवस्थेने डॉ. विशाखा शिंदेला आज सर्शत जामीन दिला, तेवढ्याने प्रश्न सुटणार नाही. महाराष्ट्र शासनाने डॉ विशाखा शिंदे वरील सर्व गुन्हे बिनर्शत मागे घेवून तिला दोष मुक्त करावे अशी मागणी आज देवळाली हेल्प टीमने राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे यांचेकडे केली आहे.
हेल्प टीमचे दत्तात्रय कडू पाटील, आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, शेतकरी संघटनेचे प्रशांत कराळे, सागर सोनवणे, ऋषिकेश संसारे, विजय कुमावत, अमजद इनामदार, खालिद शेख, गिताराम बर्डे, पांडुरंग शेटे आदी हेल्प टीमच्या सदस्यांनी मुख्यमंत्री महोदयांकडे केलेल्या मागणीत म्हंटले आहे की, देवळाली प्रवरा येथील सुकन्या डॉ. विशाखा शिंदे अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालय जाळीत प्रकरणी मागील ५-६ दिवसापासून पोलिस कोठडी मध्ये होत्या. त्यांना आज मे न्यायालयाने सशर्त जामीन दिला आहे. अहमदनगर जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत झालेल्या रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्यांच्या वर दाखल झाला आहे. डॉ. विशाखा ह्या अहमदनगर जिल्हा रुग्णालयात अस्थीरोग (Orthopedics) विभागात पदव्युत्तर पदवीका (Post-graduate diploma) करणाऱ्या शिकाऊ डॉक्टर आहेत. थोडक्यात काय तर त्या अस्थीरोग विभागात शिकणाऱ्या विद्यार्थीनी आहेत. कोविड रुग्णांवर उपचार चालू असणाऱ्या ICU विभागात काही कारणांमुळे आग लागली. त्या कारणाचा शोध पोलीस व शासनाच्या इतर यंत्रणा करत आहेत. या आगीत होरपळून काही रुग्णांचा दुर्दैवी अंत झाला.
डॉ. विशाखा ह्या त्या दिवशी या विभागात ड्युटी वर होत्या. या प्रकरणी कारवाई म्हणून त्या दिवशी ड्युटी वर असणाऱ्या काही परिचारिका आणि डॉ. विशाखा ह्यांना या प्रकरणी दोषी ठरवले गेले. आरोग्य विभागाने यांना निलंबित केले तर पोलीस विभागाने यांच्यावर गुन्हा दाखल करून यांना अटक केली होती. निलंबित केल्याच्या तिसऱ्या दिवशी आरोग्य विभागाला आपली चूक लक्षात आली. डॉ. विशाखा ह्या शिकाऊ डॉक्टर असल्यामुळे त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आली. परंतु पोलिस विभागाने मात्र त्यांच्या वर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला आणि डॉ. विशाखा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्या आजपर्यंत कोठडी मध्ये आहेत आणि प्रचंड मानसिक तणावाखाली आहेत. मे न्यायल्याने त्यांना आज सशर्त जामीन मंजूर केला आहे. तथापि जामीन घेऊन हा प्रश्न सुटणार नाही.
डॉ. विशाखा ह्या एका सरकारी रुग्णालयात आपली जबाबदारी बजावत होत्या. त्या तिथे एक शिकाऊ डॉक्टर म्हणून काम करत होत्या. रुग्णालय प्रशासन आणि नियोजन यांच्याशी त्यांचा काही एक संबंध नव्हता. त्यामुळे जर काही तांत्रिक कारणांमुळे आग लागली असेल तर डॉ. विशाखा ह्यांना त्या प्रकरणी दोषी ठरवणे सर्वस्वी चुकीचे आहे. रुग्णालयातील आग रोधक यंत्रणा आणि त्याची तपासणी ( fire safety audit) याच्याशी त्यांचा काही एक संबंध नाही. तरीही त्यांना या प्रकरणी गोवण्यात येत आहे. डॉ. विशाखा ह्यांचा बळी देऊन खऱ्या गुन्हेगारांना पाठीशी घालण्याची ही खेळी आहे. ड्युटीवर असणारा डॉक्टर रुग्ण तपासणी करेल की वार्ड मधील वायरी आणि इलेक्ट्रॉनिक वास्तू तपासेल? त्यामुळे पदव्युत्तर शिक्षण घेऊन समाजात नावारुपाला येण्याच्या डॉ. विशाखा ह्यांच्या स्वप्नाला ह्यामुळे सुरुंग लागला आहे. आज डॉ. विशाखा आहेत, उद्या दुसरे कोणी असू शकेल. त्यामुळे विशाखाला न्याय मिळाला पाहिजे. म्हणून एका महिला डॉक्टरच आयुष्य उध्वस्त होण्यापासून वाचविणेसाठी महाराष्ट्र शासनाने डॉ विशाखा शिंदे यांचेवरील सर्व गुन्हे बिनर्शत मागे घेवून तिला दोष मुक्त करावे असे मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे यांना देवळाली हेल्प टीम ने पाठविलेल्या निवेदनात शेवटी म्हंटले आहे.