अहमदनगर

शाळेला शैक्षणिक साहित्य व सुविधा पुरविण्यासाठी कटिबद्ध- सरपंच हारदे

बाळकृष्ण भोसले :
राहरी – प्राथमिक शाळेला आवश्यक शैक्षणिक साहित्य व भौगोलिक सुविधा कमी पडणार नाहीत यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सदैव प्रयत्नशील राहणार आहे. पालक व शिक्षकांनी आपापली जबाबदारी ओळखत आदर्श पिढी घडविण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन करत शासननिर्णयानुसार शाळा सुरू होत आहे. १ ली ते ४ थी च्या मुलांचे कोरोना काळात शैक्षणिक वर्ष बंद असल्याने नुकसान झाले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत शिक्षकांचे काम वाढले आहे. वेळेनुसार तयारी करवून घ्यावी. या शाळेतील शिक्षक अतिशय परिश्रम घेत आहेत, मुलांची ने-आण करताना काळजी घ्यावी, दुरवरून येणारी मुले एकत्रित बोलवावी. त्यामुळे त्यांचा वेळ वाचणार असल्याचे सरपंच गणेश हारदे म्हणाले.
तालुक्यातील चिंचोली येथील जिल्हा परिषद भटारकर वस्ती शाळेत पालक मेळाव्यानिमित्त भरलेल्या सहविचार सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पारखे होते. प्रसंगी उपाध्यक्ष दिलिप दाढकर, मुख्याध्यापक मिनाक्षी पाळंदे, वाल्मिक हारदे, बबन पठारे उपस्थित होते. प्रारंभी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वललाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
प्रास्ताविकात श्री सजन सर यांनी शालेय शिक्षण विभागाचे शाळा भरविण्यासंदर्भातील दिशानिर्देश पालकांपुढे मांडत याचे पालन करण्याचे आवाहन केले. ५० टक्के उपस्थितीची अट पालक मेळाव्यात सांगत दिवसा आड पुर्णक्षमतेने शाळा सुरू करण्याबाबत तसेच शाळा निर्जंतुकीकरण व मुलांसोबत जेवणाचे डबे पाठवू नयेत. पालकांनी पाल्यांना स्वतः शाळेत ने-आण करावी. ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू असून अँपद्वारे दररोज अभ्यास घेण्याबाबत आवाहन केले.
अध्यापिका वंदना कोरुलकर यांनी शालेय शिक्षण विभागाची दिक्षा अँपद्वारे शिक्षण देण्याची सुविधा, द्रुकश्राव्य साहित्याद्वारे शिक्षण, तसेच ईबालभारती अँपद्वारे अभ्यासक्रम सुरू असून ऑडिओ व्हिज्युअल द्वारे अभ्यासक्रम निवडता येत असल्याचे सांगत सुविधा उपक्रमाद्वारे दर शनिवारी अत्यंत सोप्या पध्दतीने ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू असून पालकांनी आपल्या पाल्याचा यात मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविण्यासाठी आग्रही राहण्याचे सांगितले.
शाळेची पटसंख्या २५२ असून जवळपास १६३ विद्यार्थी ऑनलाइन स्वाध्याय उपक्रमात सहभाग नोंदवत असून विद्यार्थ्यांचा स्पर्धा परिक्षेसारखा सराव याद्वारे होत आहे. तर ५२ विद्यार्थ्यांच्या पालकांकडे अँड्रॉईड मोबाईल नसल्याने त्यांना यात सहभाग नोंदविता येत नाही. समाजातील दानशूर व्यक्तिंनी यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन मुख्याध्यापिका मिनाक्षी पाळंदे यांनी करत गटशिक्षणाधिकारी सुनील सुर्यवंशी, विस्तार अधिकारी अनिता निऱ्हाणे, केंद्रप्रमुख छाया ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा प्रगतीपथावर असल्याचे सांगितले.
प्रसंगी अध्यापक सचिन पारेकर, सुरेखा भाकरे, निला कडाळे, संजय बोकंद, हौशिनाथ सजन, छाया बलसाने आदिंसह पालक, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button