सामाजिक
ग्रामीण रुग्णालयांमधील कंत्राटी वाहन चालकांचे थकीत वेतन देण्याची जन आधार सामाजिक संघटनेची मागणी
राहुरी/ जावेद शेख : ग्रामीण रुग्णालयामधील सर्व कंत्राटी वाहन चालकांची थकित वेतन मिळण्याच्या मागणीसाठी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले. यावेळी जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे समवेत अमित गांधी, वाहन चालक दीपक कांबळे, रोहित होडशीळ, कडूबाळ खरात, दत्तात्रय ठुबे, बाबासाहेब गोफने, विलास शिंदे, गुलाब शिवरकर, रुपेश घंगाळे, किशोर बनसोडे, दिगंबर मुखेकर, सचिन साळुंखे आदी उपस्थित होते. कंत्राटी वाहन चालक दि.१ एप्रिल २०२१ पासून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुनील पोखरणा यांचे तोंडी आदेश व सेवा अभियंता अहमदनगर व वैद्यकीय अधीक्षक यांच्या सूचनेनुसार अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयांमध्ये कंत्राटी वाहन चालक म्हणून आजपर्यंत २४ तास सेवा देण्याचे काम करीत आहेत. सर्व कंत्राटी वाहन चालकांना विमा संरक्षण नसताना देखील कोविड रुग्णांची सेवा करीत आहेत व आजपर्यंत कामाचे वेतन मिळालेले नाही. तसेच कोविड भत्ता सुद्धा मिळालेला नाही. तरी सर्व कंत्राटी वाहन चालकांना समान काम समान वेतन नुसार थकित वेतन मिळावे. त्याचप्रमाणे मागील ठेकेदाराकडून मागील वर्षामधील देखील काही वाहन चालकाचे वेतन मिळालेले नाही. सर्व कंत्राटी वाहन चालक १० ते १५ वर्षापासून कंत्राटी पद्धतीने आरोग्य सेवा करण्याचे काम करीत आहेत. तरी सर्व वाहन चालकांना १ एप्रिल २०२१ पासून थकलेले वेतन लवकरात लवकर मिळावे या मागणीचे निवेदन देण्यात आले.