सामाजिक

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त दिव्यांग निर्णय दिनदर्शिकेचे प्रकाशन

राहुरी – थोर समाजसेविका आणि भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त दिव्यांग शक्ती सेवा संस्थेच्या “दिव्यांग निर्णय” दिनदर्शिकेचे प्रकाशन गाडगेबाबा आश्रम शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक गजानन खर्चे यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दवनगाव शाखाध्यक्ष नानासाहेब खपके होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुकर घाडगे यांनी केले. “दिव्यांग निर्णय दिनदर्शिका” चा मुख्य उद्देश समाजातील दिव्यांग घटकांपर्यंत दिव्यांगांसाठी असलेल्या योजना आणि उपक्रमांची माहिती पोहोचवणे हा आहे. दिव्यांग शक्ती सेवा संस्थेच्या माध्यमातून 25 शाखा दिव्यांगांच्या समस्यांचे समाधान करण्यासाठी काम करत आहेत. राहुरी तालुक्यातील कोणताही दिव्यांग बांधव शासनाच्या योजनांपासून वंचित राहू नये, यासाठी संस्था प्रयत्नशील आहे.

गजानन खर्चे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना दिव्यांग शक्ती सेवा संस्था दिव्यांगांसाठी वरदान ठरल्याचे सांगितले. संस्थेच्या “माणुसकीची भिंत” या उपक्रमामुळे अनेक दिव्यांग बांधवांना फायदा होत आहे. कार्यक्रमादरम्यान संस्थेच्या उपक्रमांसाठी 1,001 रुपयांची देणगी मिळाली.

यावेळी कोंढवड शाखाध्यक्ष विजय म्हसे यांनी संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली. त्यांनी “माणुसकीची भिंत,” “चला घर बांधूया दिव्यांगाचे,” “चला व्यावसायिक बनवूया,” “चला चूल पेटवूया दिव्यांगाची,” फराळ वाटप, दिव्यांग उपयोगी साहित्य वाटप आदी उपक्रमांबद्दल माहिती दिली. शासनाच्या योजना शिबिरांद्वारे दिव्यांगांपर्यंत पोहोचवण्याचे काम संस्थेद्वारे होत असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमादरम्यान गजानन खर्चे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच नानासाहेब खपके यांना शाखाध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाला संस्थेचे खजिनदार सलीमभाई शेख, राहुरी तालुका संघटक भास्करराव दरंदले, शहर कार्याध्यक्ष संजय देवरे, राहुरी शहराध्यक्ष जुबेर मुसानी, तालुका कार्याध्यक्ष सुरेश दानवे, माहेगाव शाखाध्यक्ष भरत आढाव, माहेगाव उपाध्यक्ष जगन्नाथ हापसे, चेडगाव उपाध्यक्ष बाळासाहेब तरवडे, देवळाली प्रवरा शहर सचिव सुखदेव किर्तने, राहुरी तालुका मुखबधीर संघटना वेणूनाथ आहेर, कनगर शाखा उपाध्यक्ष रवींद्र दिवे, दरडगाव थडी शाखाध्यक्ष बाळासाहेब गांडळ, शिलेगाव शाखाध्यक्ष चंद्रकांत रेबडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी राहुरी तालुका संपर्क प्रमुख रवींद्र भुजाडी यांनी आभार प्रदर्शन केले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button