अहिल्यानगर
पवित्र मरीयेची भक्ती, प्रार्थना जीवनात महत्वाची- सतीश कदम; हरिगाव मतमाउली यात्रापूर्व सातवा नोव्हेना शनिवार संपन्न
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : श्रीरामपूर तालुक्यातील संत तेरेजा चर्च मतमाउली भक्तिस्थान येथे मतमाउली यात्रापूर्व सातवा शनिवार नोव्हेना भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. याप्रसंगी नोव्हेनामध्ये ख्रिस्त राजा चर्च घोडेगाव येथील प्रमुख धर्मगुरू सतीश कदम, डॉमनिक ब्राम्हणे, हरिगाव चर्च प्रमुख धर्मगुरू सुरेश साठे, सचिन मुन्तोडे आदी धर्मगुरू सहभागी होते.
ख्रिस्तसभेच्या सहवासात नित्य सहाय्य करणारी माता या विषयावर प्रवचन करताना घोडेगाव प्रमुख धर्मगुरू सतीश कदम यांनी सांगितले की, आज मतमाउलीच्या सन्मानार्थ सर्व भाविक एकत्र आलो आहोत. ख्रिस्तसभेमध्ये ही पवित्र मरिया आमच्यामध्ये आहे. आमच्या विनंत्या मान्य कर, ती नित्य सहाय्य करणारी माता आहे. पवित्र मरीयेची भक्ती व प्रार्थना ही जीवनात फार महत्वाची आहे. तिला देवमाता म्हणजे देवाची माता मानली जाते. ती नेहमी आपल्याला संकटात दु:खात सतत मदत करीत असते. जर आपल्या माउलीला येशू ख्रिस्तापासून विभक्त केले तर आपले कुटुंबामध्ये विभक्त व वाद निर्माण होत असतो व देवाचा आशीर्वाद आपल्याला मिळत नसतो. ही माउली फक्त आपल्या ख्रिस्ती लोकांची नसून ती सर्व मानवजातीची आहे. जे तिचा धावा करतात ती त्यांच्या विनंत्या ऐकणारी आहे. तिची भक्ती करणे म्हणजे देवी म्हणून नाही तर ती परमेश्वराची आणि मानवाची मध्यस्थी आहे. दुवा आहे. तिला दैवी मातृत्व लाभले आहे. येशू ख्रिस्ताची आई आहे. तरी मातेपासून पुत्राला विभक्त करू नये. त्यामुळे आपल्याला कुटुंबात विभक्तपण येतो. आपल्याला आशीर्वाद मिळत नाही जिथे मतमाउली आहे, तिथे येशू ख्रिस्त आहे. तिची जपमाळ करणे गरजेचे आहे. तिची भक्ती जपमाळ करणे त्यामुळे जीवनात शांतता सुख नांदते. तिला देवाची आई होण्याचे भाग्य लाभले आहे आदी प. मरीयेविषयी जीवनाबद्दल महिमा वर्णन केला व तिचा आदर्श आपल्या सर्वांनी घ्यावा.
सातव्या शनिवारी पावसाची उघडीप असल्याने प्रारंभी मतमाउली मूर्तीच्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यात माळवाडगाव परिसरातील हरिगाव परिसरातील महिला पुरुष भाविक सहभागी झाले होते. यावेळी हरिगाव येथील महिलांनी प.मरिया मूर्तीची पालखी हाती घेतली होती. येत्या आठव्या शनिवारी दि २० ऑगस्ट रोजी “पवित्र मरीयेचे ध्येय तुझ्याप्रमाणे होवो ह्या विषयावर संत मेरी चर्च संगमनेर येथील धर्मगुरू यांचे प्रवचन होणार आहे. तरी भाविकांनी नोव्हेना भक्तीमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन संत तेरेजा चर्च हरिगाव प्रमुख धर्मगुरू सुरेश साठे, सहकारी धर्मगुरू व धर्मभगिनी, हरिगाव, उन्दिरगाव ग्रामस्थ यांनी केले.