निधन वार्ता
पॅन्थर ते रिपाई परिवर्तनवादी प्रवासाचा अखेर…!
राहुरी – दलित बहुजन चळवळीशी आपल्या उभ्या आयुष्याचं नातं सांगणारा नि चळवळीशी एकनिष्ठ राहतं तळागाळातील जनतेशी आपली नाळ घट्ट जोडून त्यांच्या सुखदुःखात समरस होणारं व्यक्तिमत्व अशी ओळख असणारा समाजसेवक धीरोदात्त पॅॅन्थर आरपीआई आठवले गटाचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य श्रावणरावजी वाघमारे यांचे आज दु:खद निधन झाले. त्यांच्या निधनाने दलित चळवळीचा एक कणा निखळल्याची भावना आंबेडकरी चळवळ तसेच सर्वसामान्य जनतेतून व्यक्त होत आहे.
घरची हालाखीची परिस्थिती माञ कानावर पडत असलेले त्यावेळेचे मराठवाडा नामांतराचे आंदोलनाचे आवाज स्वस्थ बसू देत नव्हते. या ना त्या प्रत्येक खेडेगावातून नामांतर आंदोलनाचे वारे वेगाने वाहात होते. त्याचवेळी दलित पॅन्थर या जहाल संघटनेचा जन्म झाला नि श्रावणरावांनी या लढ्यात उडी घेतली. राजा ढाले, नामदेव ढसाळ, जोगेंद्र कवाडे सरांपासून रामदास आठवले पर्यंत सर्वांशी जवळून संबंध असलेला व त्या संबंधांचा उपयोग जनसामान्यांचे जगण्याचे प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न श्रावणरावांनी आपल्या उभ्या आयुष्यात केला. पॅन्थरची चळवळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रूजविण्या व फोफावण्यासाठी पहिल्या फळीतील भाई संगारे, नगरचे बाळासाहेब चव्हाण, अकोल्याचे विजय वाकचौरे, कोपरगावचे ताराचंद साञळकर, दिपक गायकवाड आदी धुरीणांबरोबर श्रावणराव अग्रेसर होते. जनसामान्यांचे मूलभूत प्रश्न तसेच त्यांच्यावरील अन्याय अत्याचाराविरोधात त्यांनी नेहमीच संघर्ष शेवटपर्यंत कायम ठेवला. धरणग्रस्त व विद्यापीठातील कामगार प्रश्नी लढा उभारून त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठीचे त्यांचे प्रयत्न उल्लेखनीय होते.
त्याच दरम्यान ते श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथून जिल्हा परिषदेसाठी ऊमेदवार झाले व बहुमताने निवडून आले. आपल्या जिल्हा परिषद कार्यकाळात त्यांनी आपल्या पदाचा उपयोग जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी केला. समाजसेवेचे व्रत जपत असताना आपल्या घराकडे दुर्लक्ष व्हायचं, याकामी त्यांना आपल्या सहचारिणीने मोलाची साथ दिली व श्रावणरावांच्या अनुपस्थितीत प्रसंगी मोलमजुरी करून आपल्या मुलाबाळांचे भरणपोषण, शिक्षण करीत अत्युच्च संस्कार दिले.
मात्र म्हणतात ना चळवळीचा राजा सदा कफल्लक असतो. तीच अवस्था बाळासाहेब चव्हाणांनंतर श्रावणरावांची होती. तरूण वयात समाजासाठी झगडणारा व त्यांचे दुख ते आपले मानणारा कार्यकर्त्याला समाज नि नेताही विसरतो. बहुधा त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणून श्रावणरावांकडे पाहता येईल. ‘केवळ शब्दाने पोटं भरतं नसतात, त्यासाठी पोटात काहितरी ढकलावेच लागते’ हेच बहुधा दलित चळवळीतल्या नेत्यांना समजले नसावे हेच खरे.