ठळक बातम्या
श्रीरामपूर जिल्हा ना.विखे यांनी जाहीर करावा-गणेशराव मुदगुले
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : श्रीरामपूर जिल्ह्यासाठी आवश्यक भौगोलिक परिस्थिती असल्याने हा प्रश्न विचाराधीन आहे. लवकरच हा जिल्हा जाहीर होणार ही आश्वासने मिळत होती. त्यासाठी सर्व थरातून प्रयत्न केले जात होते. परंतु हा श्रीरामपूर जिल्हा मागील महाविकास आघाडी सरकारकडून त्याचप्रमाणे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात असताना जाहीर होऊ शकला नाही. त्याची कारणे सुद्धा जनतेला माहित असावी. आता नव्याने स्थापन झालेल्या मंत्रिमंडळात जेष्ठनेते ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्वप्रथम कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली ही अभिमानाची बाब आहे. त्यांच्या हस्ते अहमदनगर येथे स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण होणार आहे व ते नगर जिल्ह्याचे पालकमंत्री होतील असे दिसते. तरी स्वातंत्र्यदिनी श्रीरामपूरकरांना भेट म्हणून श्रीरामपूर जिल्हा घोषित करावा व त्यासाठी जलद गतीने प्रयत्न व्हावेत अशी मागणी तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन गणेशराव मूदगुले यांनी केली.
महाराष्ट्र राज्यातील श्रीरामपूर शहर हे अहमदनगर जिल्ह्यातील नगर खालोखल आकारमानाने दुसर्या क्रमांकाचे शहर आहे. नगर शहरापासून श्रीरामपूर ७० कि मी वर आहे. शहराच्या उत्तरेस कोपरगाव, दक्षिणेस राहुरी, पुर्वेला नेवासा, पश्चिमेस संगमनेर ही महत्वाची शहरे आहेत. दौंड मनमाड रेल्वेमार्ग सुरु झाला, त्यावेळी बेलापूर हे रेल्वे स्थानक झाले. बेलापूरपासून १५ कि मी अंतरावर हरिगाव येथे पहिला साखर कारखाना १९२० मध्ये झाला. १९४७ ला श्रीरामपूर नगरपालिकेची स्थापना झाली. श्रीरामपूर येथून अनेक महत्वाच्या शहरांना रस्ते मार्गाने जोडले आहे. लांब पल्याच्या रेल्वे येथून धावतात. श्रीरामपूर जवळ खंडाला गणपती मंदिर, साईबाबा शिर्डी मंदिर, देवगत दत्त मंदिर, शानिशिंगणापूर आदी आहेत. क्षेत्रफळ ५६९ कि.मी असून श्रीरामपूर येथे प्रांत कार्यालय, रेल्वे स्टेशन, आरटीओ कार्यालय, उप जिल्हा रुग्णालय, एमआयडीसी, विभागीय एसटी कार्यशाळा, पोलीस उप अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक आदी महत्वाची कार्यालये आहेत. त्यात माजी मंत्री स्व गोविंदराव आदिक यांचे मोलाचे योगदान आहे. अशी परिस्थिती असल्याने जिल्ह्यात भौगोलिक दृष्ट्या श्रीरामपूर शिवाय कोठेही नाही. तरी ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्रीरामपूर जिल्हा स्वातंत्र्यदिनी जाहीर करावा अशी मागणी गणेशराव मूदगुले यांनी केली आहे. तसेच श्रीरामपूर जिल्हा कृती समिती आदींनी पाठपुरावा करावा व लोणी श्रीरामपूर येथे आल्यावर सर्व शहरवासीयांनी व सर्व पक्ष प्रतिनिधी यांनी भेट घेऊन प्रलंबित प्रश्न सुटण्यासाठी प्रयत्न करावेत असे मुदगुले यांनी सांगितले.