अखेर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचा विषय आ. कर्डिले यांच्या मध्यस्थीने सुटण्याच्या मार्गावर
मराठा एकीकरण समितीचे देवेंद्र लांबे यांच्या प्रयत्नांना यश
राहुरी – राहुरी येथे गुरुवार, दि. १६ रोजी राहुरी विधानसभेचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा बसविण्याविषयी शासकीय अधिकारी व मराठा एकीकरण समिती, शिवस्मारक समितीच्या सदस्यांची बैठक संपन्न झाली.
या बैठकीस तहसीलदार नामदेव पाटील, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे, महामार्ग प्रकल्प अभियंता आलोक सिंग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री. सय्यद, रा. न. पा. चे अभियंता पराग दराडे, मराठा एकीकरण समिती व शिवसेना तालुका प्रमुख देवेंद्र लांबे, भाजप तालुकाध्यक्ष सुरेश बानकर, माजी विरोधी पक्षनेते दादा पाटील सोनावणे, माजी उपनगराध्यक्ष रावसाहेब तनपुरे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पारख, कांतीलाल जगधने, सर्जेराव घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याविषयीची बैठक संपताच शासकीय अधिकाऱ्यांनी तातडीने जागेचे मोजमाप करण्याची प्रक्रिया सुरू केली. “काम करणारे आमदार शिवाजी कर्डिलेच” असल्याची चर्चा राहुरी शहरात सर्वत्र सुरू आहे.
या प्रसंगी आ. शिवाजी कर्डिले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा निर्मितीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी निधी मंजूर केला असल्याची माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा नगर-मनमाड रस्त्याच्या कडेला जुन्या पाण्याच्या टाकीच्या ठिकाणी व्हावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून मराठा एकीकरण समिती आणि शिवशंभू प्रेमींनी केली होती. या मागणीच्या अनुषंगाने पाण्याच्या टाकीच्या जागेचे मोजमाप करून प्रस्ताव तयार करण्याची सूचना आ. कर्डिले यांनी अधिकाऱ्यांना दिली.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा जुन्या पाण्याच्या टाकीच्या जागेवर व्हावा, यासाठी शिवसेना तालुका प्रमुख देवेंद्र लांबे पा. यांनी मराठा एकीकरण समितीच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा केला होता. अनेक आंदोलनेदेखील करण्यात आली होती. आ. शिवाजी कर्डिले यांनी आमदारकी स्वीकारल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचा विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल मराठा एकीकरण समितीच्या सदस्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
मराठा एकीकरण समिती व शिवशंभू प्रेमींच्या वतीने सतीश घुले, बंडू म्हसे, बलराज पाटील, अरुण निमसे, महेंद्र शेळके, अशोक तनपुरे, सतीश फुलसौंदर, रोहित नालकर, विक्रम भूजाडी, सतीश चोथे, अविनाश क्षीरसागर, नारायण धोंगडे, गणेश खैरे, शरद येवले, सचिन मेहेत्रे, उमेश शेळके, शिवाजी डौले, अक्षय तनपुरे, किशोर येवले, बाबा शिंदे, भाऊसाहेब पवार, चांगदेव भोंगळ, राजेंद्र दरक, राम शिंदे, अरुण डौले आदी उपस्थित होते.