ठळक बातम्या

ओला यांची नार्को टेस्ट आणि मालमत्तेची चौकशी करा – डॉ. मकासरे

राहुरी – अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची नार्को टेस्ट सह मालमत्तेची चौकशी करून या जिल्ह्यातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी डॉ. विजय मकासरे यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. 

डॉ. मकासरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राकेश ओला यांची अहिल्यानगर येथे नेमणूक झाल्यापासून ते कायमच वादग्रस्त ठरलेले आहेत. त्यांच्या विरोधात या जिल्ह्यात अनेक वेळा मोठमोठी आंदोलने आणि उपोषनेही झालेली आहेत. ओला यांच्या विरोधात आपण अहिल्यानगर सत्र न्यायालयात ऍट्रॉसिटी अंतर्गत तक्रार दाखल केलेली असून त्यावर न्यायालयाचा निर्णय घेणे बाकी आहे.

राकेश ओला यांच्या कार्यकाळात जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री, अवैध दारू विक्री, गांजा, वाळू तस्करी असे अनेक मोठमोठे अवैध व्यवसाय चालू असून त्या संबंधित सर्व व्हिडिओ व ऑडिओ माझ्याकडे पुराव्यानिशी उपलब्ध आहेत. ओला यांच्या या गैर कृत्यामुळे जिल्ह्यातील अनेक तरुण वाम मार्गाला लागलेले असून ते उध्वस्त होत आहेत. 

आपण मुख्यमंत्र्याचे राईट हॅन्ड असल्याची बतावणी करत आपले कोणीही काहीही करू शकत नाहीत अशा अविर्भावात ओला सध्या जिल्ह्यात फिरत आहेत. याशिवाय स्थानिक लोकप्रतिनिधी आ. शिवाजीराव कर्डिले यांच्या नावाचा गैरवापर करून जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार घडून आणत आहेत, असा आरोपही डॉ. मकासरे यांनी केला आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या या कृत्याने सगळ्यात मोठा पक्ष असणाऱ्या भारतीय जनता पक्षाची नाहक बदनामी होत असून त्यांच्या हकालपट्टीसह त्यांच्या मालमत्तेची चौकशी आणि नार्को टेस्ट करावी अशी मागणी डॉ. मकासरे यांनी केली आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button