अहमदनगर

भारतीय संविधान दिन लोकशाही बळकटीसाठी प्रेरणा देणारा- सुभाष लिंगायत

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : १५ ऑगस्ट १९४७ रोजी परकीय इंग्रजी राजवटीपासून भारत स्वतंत्र झाला. देशाला स्वतंत्र राज्यघटना असावी म्हणून सर्वसंमत्तीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्षे ११ महिने १८ दिवस अथक परिश्रमातून भारतीय संविधान प्रत २६ नोव्हेंबर १९४९ रोजी सादर केली. २६ जानेवारी १९५० पासून भारतात प्रजासत्ताक राज्य सुरू झाले. संविधानाचा सन्मान आणि उपयुक्तता सर्वांच्या मनात आणि कृतीत असण्यासाठी, लोकशाही बळकटीचा एक प्रेरणादिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो हे भूषणावह असल्याचे मत आंतरभारती श्रीरामपूर शाखेचे संस्थापक, अध्यक्ष सुभाष लिंगायत यांनी व्यक्त केले.

येथील विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठान, भूमी फौऊंडेशन, वाचन संस्कृती प्रतिष्ठन, आंतरभारती श्रीरामपूर शाखा यांच्यातर्फे विविध उपक्रमांनी संविधान दिन कार्यक्रमाचे आयोजन बोरावके नगर येथील विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठान कार्यालयात करण्यात आले होते, त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सुभाष लिंगायत बोलत होते. अध्यक्षस्थानी ॲड. रावसाहेब शिंदे प्रतिष्ठानचे कार्यकारिणी चेअरमन माजी प्राचार्य टी. ई. शेळके होते. प्रारंभी महामानव, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक सचिव सुखदेव सुकळे यांनी स्वागत करून उपस्थितांचे सत्कार केले. तसेच भारतीय संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले. वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी ‘भारतीय संविधान दिनाचे औचित्य’ हा लेख सादर केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्त्वाचा परिचय करून दिला.

सुभाष लिंगायत यांनी मनोगतात पुढे सांगितले की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून २६ नोव्हेंबर २०१५ पासून हा दिन भारत सरकारने संविधान दिन अधिकृतपणे साजरा करण्याचा निर्णय घेतला तेव्हापासून हा दिवस सर्वत्र साजरा केला जात आहे. सर्वसामान्य माणसाला, स्त्रियांना मतदानाचा हक्क प्राप्त झाला. आजच्या विधानसभा निवडणुकीत दिसून आले की, सर्वसामान्य सेवाभावी कार्यकर्ता हा दिग्गज आणि सर्व सत्ताधीश असणाऱ्या उमेदवारांना पराभूत करू शकतो, ही सर्वसामान्य माणसाला संविधानाने दिलेली शक्ती आहे, या संविधानाचे रक्षण, प्रामाणिकपणे आचरण केले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी माजी मुख्याधापक दत्तात्रय चव्हाण, भूमी फौऊंडेशनचे आरोग्यमित्र भीमराज बागूल यांनी मनोगत व्यक्त केले. पत्रकार बाबासाहेब चेडे यांनी ‘भारतीय संविधान’ ही कविता सादर केली. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य टी.ई. शेळके म्हणाले, भारतीय संविधान हे आपल्या लोकशाहीचे बलस्थान आहे. शासन आणि जनता यांना संविधानाचे महत्त्व कळून त्यांनी त्याप्रमाणे आचरण केले की देशाचा सर्वांगीण विकास होणे सोपे जाते. प्रास्ताविकेतील स्वातंत्र्य, समानता, राष्ट्रीय एकात्मता, बंधुता इत्यादी तत्त्वे आचरणात आली पाहिजेत. त्यासाठी संविधान वाचन सर्वांनी केले पाहिजे. सामान्य माणसाला ते कळले पाहिजे. मोठमोठ्या सभेपेक्षा छोट्या छोट्या संस्था, समूहातर्फे हे संविधान जागरण झाले पाहिजे. देशभक्तीने प्रेरित झालेल्या काही संघटनांनी, व्यक्तींनी वाड्यावस्त्यावर, घरादारापर्यंत प्रचार केला, त्यामुळे मतदानजागृती आणि वाढ झाल्याचे दिसून येते.

संविधानाच्या शिक्षणासाठी विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठान, वाचन संस्कृती प्रतिष्ठत, भूमी फौऊंडेशन, आंतरभारती असे प्रयत्न करतात त्यांचा आदर्श सर्वत्र वाढला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. संजय बुरकुले, सौ.सुरेखा बुरकुले, सौ.शीतल बुरकुले यांनी नियोजन केले. सूत्रसंचालन साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी करून सर्वांना ‘दिव्यत्वाचे चिंतन’ व ‘साहित्याचे नंदादीप’ ही पुस्तके देऊन पुस्तकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखांचे महत्त्व सांगितले. भीमराज बागूल यांनी प्रा.डॉ. कैलास पवार यांच्या शुभेच्छा सादर करून आभार मानले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button