हरेगाव मतमाउली यात्रा भाविकांसाठी आवश्यक सुविधा देण्यासाठी सहकार्य करणार – आ.कानडे
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : श्रीरामपूर तालुक्यातील संत तेरेजा मतमाउली भक्तिस्थान येथे १४ सप्टेंबर रोजी भव्य मतमाउली यात्रा महोत्सव साजरा करण्यात येणार असल्याने यात्रेतील भाविकांसाठी आवश्यक सुविधा देण्यासाठी माझ्याकडून पूर्ण सहकार्य मिळेल असे आश्वासन श्रीरामपूरचे विद्यमान आमदार लहू कानडे यांनी मतमाउली यात्रापूर्व तिसऱ्या नोव्हेनाच्या शनिवारी हरेगाव चर्चला भेटी बरोबर भाविकांना शुभेच्छा देऊन दिले.
यावेळी प्रमुख धर्मगुरू डॉमनिक व सहकारी धर्मगुरू, ग्रामस्थ यांच्या वतीने आमदार कानडे यांचा सत्कार करण्यात आला. मतमाउलीची मिरवणूक निघाल्यावर चर्च कार्यालयात आ.कानडे यांच्या समोर फा.डॉमनिक व हरेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते यांनी विविध समस्या मांडल्या.
त्यावर आ.कानडे यांनी सांगितले की, चर्चगेट ते चर्चपर्यंतचा खराब रस्ता तातडीने सुरळीत केला जाईल. हरेगाव ते खैरी निमगाव रस्त्याची बिकट परीस्थिती झाल्याने ते पण काम यात्रेपूर्वी करण्यात येणार आहे. जलजीवन योजनेतून परिसरात पिण्याचे पाण्याची टाकी उभारण्यात येईल. यात्रेवेळी फिरते शौचालये देण्यात येतील. भक्तनिवास आदी सुविधा देण्यासाठी पूर्ण सहकार्य राहील. काही तांत्रिक अडचणी असल्यास माझ्या परीने त्या दूर केल्या जातील असेही आ.कानडे म्हणाले.
यावेळी चर्चेत सचिन गुजर, ज्ञानेश्वर मुरकुटे, ज्यो दिवे, बी.जी. पारधे, सुभाष पंडित, डी एस गायकवाड आदी सहभागी झाले होते. यावेळी फा.संतान यांचा वाढदिवस असल्याने आ.लहू कानडे, सचिन गुजर, ज्ञानेश्वर मुरकुटे आदींनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.