समाजकारणाचा वारसा घेवून निवडणूक न लढवता तालुक्याच्या विकासासाठी काम करणार – देवेंद्र लांबे
राहुरी | प्रतिनिधी – राहुरी विधानसभा निवडणुकीत अनेक मातब्बर निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत.त्याचप्रमाणे निवडणुकीच्या रिंगणात मराठा संस्थेचे अध्यक्ष तथा शिवसेना पक्षाचे राहुरी तालुका प्रमुख देवेंद्र लांबे पा. हे मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून निवडणूक लढवणार अशी चर्चा सर्वत्र सुरु झाली होती.याच विषयावरून राहुरी तालुक्यातील मराठा बांधवांमध्ये देवेंद्र लांबे यांनी उमेदवारी करावी म्हणून मोर्चे बांधणी देखील सुरु केली होती.
याच दरम्यान देवेंद्र लांबे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे कि, गेल्या १४ वर्षांपासून वडील कै.अँड.एस.जी.लांबे पा.यांनी हाती घेतलेला समाजकारणाचा वसा पुढे अविरत चालविणार आहे.गेल्या १४ वर्षात छावा संघटनेचे संस्थापक/अध्यक्ष मराठा क्रांतीसूर्य कै.अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या विचारांनी प्रेरित होवून समाजातील उपेक्षित घटकांसाठी आजपर्यंत काम करत आलेलो आहोत.एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी एक तप पूर्ण केला आहे. समाजाचे आपण काहीतरी देन लागतो या भावनेतून आजपर्यंत समाजकार्य करत आलेलो आहोत.समाजाने देखील विश्वास दाखवत पूर्ण ताकतीने पाठीशी उभा राहिला आहे.
गेल्या दोन वर्षांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्यनेते एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात दाखल होत शिवसेना तालुका प्रमुख काम सुरु केले आहे.राजकीय पक्षात काम सुरु केले असले तरी राजकारण म्हणून कुठलीही गोष्ट केलेली नाही.केवळ राहुरी तालुक्यातील सर्वसामान्य लोकांना कुटुंब मानून राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण चालू ठेवले आहे.
राजकारणात गेल म्हणजे राजकारणच केले पाहिजे असे नाही.राजकारणात राहून लोकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे या विचाराचा मी एक कार्यकर्ता आहे.येवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीतच काय तर कुठल्याही निवडणुकीत स्वत: उमेदवारी न करता केवळ जे सहकारी निवडणुकांमध्ये उभे राहतील त्यांच्यासाठी काम करणार आहे तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत सर्व सहकार्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे देवेंद्र लांबे यांनी म्हटले आहे.