शिर्डी व राहुरी मतदार संघात निळवंडे कृती समितीची भूमिका ठरणार निर्णायक
राहुरी : गेल्या अनेक वर्षांपासूनचा निळवंडे लाभधारक शेतकऱ्यांचा चालू असलेला लढा बघता अनेक मोठमोठे आंदोलने व उपोषणे कृती समितीच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने राहुरी तालुक्यातील 21 गावातील निळवंडे लाभधारक शेतकरी बांधवांनी मोठ्या स्वरूपात सहभाग नोंदविलेला असून अजूनही निळवंडे धरणाच्या पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ येथील शेतकऱ्यांवर आलेली आहे.
शेतकऱ्यांना जे पाणी मिळायला हवे आहे ते पाणी मिळताना दिसत नाही. अजूनही कालव्यांच्या चाऱ्यांचा प्रश्न प्रलंबित असताना मध्यंतरी धरणाच्या पाण्यावरून खूप मोठं राजकारण सुरू आहे. त्यामुळे सध्या तरी समितीने अजून कोणाला पाठिंबा दिलेला नाही. दोन दिवसांत निळवंडे कृती समिती उद्याच्या होऊ घालणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये कोणाला पाठिंबा द्यायचा आहे याबाबत चर्चा करून निर्णय घेणार आहे आणि त्यानंतरच निळवंडे कृती समितीची भूमिका या विधानसभांसाठी निर्णायक ठरणार आहे.
निळवंडे कृती समितीकडून ज्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर करण्यात येईल, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे मोठ्या प्रमाणात शेतकरी राहतील. त्यामुळे संगमनेर, कोपरगाव, शिर्डी व राहुरी विधानसभा मतदारसंघांमध्ये निळवंडे कृती समितीची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
दादासाहेब पवार, उपाध्यक्ष निळवंडे कृती समिती अहमदनगर नाशिक.