कृषिथॉनचा “युवा कृषी उद्योजक पुरस्कार” ऋषिकेश औताडे यांना जाहीर
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : नाशिक येथील ह्युमन सर्व्हिस फाउंडेशन या संस्थेचा दरवर्षी दिला जाणारा “युवा कृषी उद्योजक पुरस्कार – २०२४” श्रीरामपूर येथील मधमाशी पालक उद्योजक ऋषिकेश औताडे यांना जाहीर झाला आहे. २२ ते २५ दरम्यान होणाऱ्या “कृषिथॉन” प्रदर्शनात हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
आजची युवा पिढी अनेक आव्हानांना सामोरे जात असताना प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन कृषी क्षेत्राला पूरक असे नाविन्यपूर्ण उद्योग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या निवडक व्यक्तींचा सन्मान संबंधित संस्था दरवर्षी करीत असते. श्री. औताडे यांनी बारा वर्षे महाविद्यालयात प्राध्यापक, प्र. प्राचार्य पदावर काम करून २०२२ मध्ये नोकरीचा राजीनामा देऊन गोदागिरी फार्म स्थापने अंतर्गत मधमाशी पालन उद्योगाचा शुभारंभ केला.
केंद्रीय मधुमक्षिका संशोधन व प्रशिक्षण केंद्र पुणे येथून शास्त्रीय मधमाशी पालन प्रशिक्षण घेऊन डाळिंब, टरबूज, खरबूज, बोर, कांदा, आंबा व इतर फळ पिके यात परागीभवन व उत्पन्न वाढ याची गरज लक्षात घेऊन मधमाशी पेट्या परागीभवनासाठी शेतकऱ्यांना भाडे तत्त्वावर देण्यास सुरुवात केली.
त्याच बरोबरीने मध व उपपदार्थ विक्री, प्रशिक्षण देणे व प्रकल्प हाताळणी या विविध संधीचा लाभ घेऊन ते वाटचाल करत आहे. याची दखल घेऊन ह्युमन सर्व्हिस फाउंडेशनचे अध्यक्ष संजय न्याहारकर यांनी हा पुरस्कार जाहीर केला. मूळचे माळेवाडी गाव व वास्तव्य शिरसगाव, श्रीरामपूर परिसरात सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.