संगमनेर येथे स्वराज्य पक्षाच्या वतीने महाराष्ट्र सरकारचा निषेध
संगमनेर शहर : अनाधिकृत अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करणे अपेक्षित असताना उलट छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली विशाळगडावरील अनाधिकृत अतिक्रमण काढणाऱ्या शिवभक्तांवर पोलिस प्रशासनाने गुन्हे दाखल केल्याने संगमनेर येथे स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र शासनाचा निषेध करून संताप व्यक्त केला आहे.
शिव, शाहू, फुले, आंबेडकर विचारांचा महाराष्ट्र म्हणून ओळख असताना कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर अतिक्रमण होत असताना या सरकारने बघ्याची भूमिका घेतली होती. काही दिवसांपूर्वी स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी हे अनाधिकृत अतिक्रमण तात्काळ काढा असे सरकारला कळविले होते. परंतु त्याकडे कानाडोळा करत या सरकारने ही मागणी फेटाळली. जेव्हा छत्रपतींच्या रक्ताचे, विचारांचे वारसदार स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वात लाखो शिवभक्त विशाल गडावर पोहचले. तिथे जो काही प्रकार घडला त्यात शिवभक्तांची काही चूक नसताना शिवभक्तांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. त्यात छत्रपती संभाजीराजे यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला गेला. या चुकीच्या घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आज संगमनेर शहर येथे स्वराज्य पक्षाच्या वतीने आशिष कानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली व निलेश पवार यांच्या नेतृत्वात निषेध नोंदविण्यात आला. तसेच संगमनेर शहर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन शिवभक्तांवरील गुन्हे मागे न घेतल्यास उग्र स्वरूपाचे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी आकाश शिंदे, जयराज दुशींग, ओंकार अभंग, आदित्य बडे, आकाश टिपरे, शमुवेल थोरात, गुरुदास सहाने यांच्यासह विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.