विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे महात्मा बसवेश्वर जयंती व कर्मवीर पुण्यतिथी साजरी
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : तालुक्यातील शिरसगाव भागातील बोरावकेनगरमधील विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठान आणि वीरशैव लिंगायत समाज श्रीरामपूर तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची ८९३ वी जयंती आणि पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची ६५ वी पुण्यतिथीनिमित्त व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचे माजी सिनेट सदस्य प्राचार्य डॉ. एकनाथ ढोणे यांचे महात्मा बसवेश्वर यांचे योगदान आणि रयत शिक्षण संस्थेचे माजी प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे यांचे कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शैक्षणिक योगदान या विषयावर व्याख्याने संपन्न झाली. प्रारंभी महात्मा बसवेश्वर व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक सचिव सुखदेव सुकळे यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष, समन्वयक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
प्राचार्य डॉ. एकनाथ ढोणे यांनी महात्मा बसवेश्वर यांचे १२ व्या शतकातील सामाजिक विषमता आणि स्त्रीपुरुष समतेचा विचार अनेक संदर्भातून सांगितला. प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे यांनी आपल्या मनोगतातून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ०४ ऑक्टोबर १९१९ रोजी रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून बहुजनांच्या जीवनातील अज्ञानाचा अंध:कार संपविला. कर्मवीराची शिक्षण संस्था ही गोरगरिबांची संस्था आहे. त्यांनी समाजसेवक, शिक्षणतपस्वी, समर्पित सेवकांच्या योगदानातून शिक्षणाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. कर्मवीर यांनी संस्था स्थापन केली म्हणून आमच्या सारखे ग्रामीण विद्यार्थी शिकले. जीवनात काही करू शकले. कर्मवीरांचे मोठेपण आभाळा एवढे उंच आहे.
यावेळी पुणे येथील प्राचार्य डॉ. अविनाश सांगोलेकर, प्रा.डॉ. समीर मंचरकर, महाबँकेचे सेवानिवृत्त अधिकारी घन:श्याम राजपाठक, बेलापूरच्या प्राचार्या डॉ. गुंफाताई कोकाटे यांची व्याख्याने झाली. वीरशैव लिंगायत समाज तालुका अध्यक्ष विशाल निकडे, ॲड. सतिश डोंगरे, डॉ. शिवाजी काळे, प्रा. शिवाजीराव बारगळ, प्रा.डॉ. बाबासाहेब शेंडगे, मुख्याध्यापक चव्हाण, सुदामराव औताडे, साहेबराव सुकळे, सुरेश बुरकुले, पत्रकार बाबासाहेब चेडे, महिला भगिनी आदिंसह मान्यवर समाजबांधव उपस्थित होते. बाळासाहेब बुरकुले, संकेत बुरकुले, प्रतिष्ठानचे खजिनदार सुयोग बुरकुले, दिनेश वाडणकर आदिंनी कार्यक्रमाचे संयोजन केले. त्यानंतर डॉ.र.बा. मंचरकर स्मृती प्रेरणा पुरस्कार संबंधी चर्चा झाली. सूत्रसंचालन डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी केले तर ॲड. सतिश डोंगरे यांनी आभार मानले.