घरेलू महिला कामगार संघटना बांधणी कार्यशाळा संपन्न
जावेद शेख | विशेष प्रतिनिधी : युवाग्राम विकास संस्था, राहुरी व कोरो इंडिया, मुंबई यांच्या वतीने महिला सक्षमीकरणाची व स्थानिक नेतृत्व विकासाची प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. ‘ज्यांचे प्रश्न त्यांचे नेतृत्व, ज्यांचे ज्ञान त्यांची मालकी’ ही संकल्पना दृढ करण्याचे काम सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून घरेलू कामगार संघटन ही प्रक्रिया राज्यभर सुरू झालेली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील तळागाळातील लोकांपर्यंत ही संकल्पना पोहोचवण्याचे काम युवाग्राम विकास संस्था तळमळीने करीत आहेत.
स्थानिक नेतृत्व विकास कार्यक्रमाचा एक भाग म्हणून युवाग्राम विकास संस्थेच्या वतीने श्रीरामपूर येथे “घरेलू महिला कामगार संघटन कार्यशाळा” घेण्यात आली. या कार्यशाळेत श्रीरामपूर येथील घरेलू महिला कामगारांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. कार्यशाळेचे उद्घाटन ज्येष्ठ विचारवंत व शिक्षणतज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी केले. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कामगार नेते प्रा. महेबूब सय्यद हे होते. याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख मार्गदर्शिका व साऊ ट्रस्ट’च्या विश्वस्त प्रतिमा कुलकर्णी, सावली संस्थेचे संचालक नितेश बनसोडे, कोरो इंडिया’च्या समन्वयक सोनम धीवर, युवाग्राम विकास संस्थेचे संचालक संभाजी पवार, फिरोज शेख, अमोल सोनवणे, श्री. दाभाडे, म्हस्के गुरुजी आदींसह मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी उद्घाटनिय संवाद करताना शिक्षणतज्ञ व विचारवंत हेरंब कुलकर्णी यांनी घरेलू महिला कामगार कायद्याबाबत सखोल माहिती देऊन, नोंदणी प्रक्रिया स्पष्ट करतानाच, संघटनेचे महत्त्व अधोरेखित केले. संघटनेमुळे बळ मिळून आत्मविश्वास निर्माण होतो. त्यामुळे घरेलू महिला कामगारांनी संघटित होण्याचे आवाहन केले. कार्यशाळेच्या मार्गदर्शिका प्रतिमा कुलकर्णी यांनी घरेलू महिला कामगारांना दैनंदिन जीवनात काय काळजी घ्यायची, कोणती कागदपत्रे महत्त्वाची आहेत, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करून, “मिळून सा-या जणी” पुढे जाण्यासाठी एकत्र येण्याचे महत्त्व सांगितले.
अध्यक्षीय भाषणात कामगार नेते प्रा. महेबूब सय्यद यांनी गरीब, दीनवाणी,अबला ही हताशवृत्ती सोडून, आपण आपल्या मेहनतीने, परिश्रमाने दुसऱ्याचे जीवन सुखकार करण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यामुळे घरेलू महिला कामगारांनी आत्मविश्वासपूर्वक एकत्र येवून, आपल्या कर्तव्यांबरोबरच हक्क मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवाग्राम विकास संस्थेचे संचालक संभाजी पवार यांनी घरेलू महिला कामगार संघटनेच्या वाटचालीचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल सोनवणे यांनी तर आभार फिरोज शेख यांनी मानले.