कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांच्याकडून सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे कौतुक
राहुरी | जावेद शेख : तालुक्यातील विशेष नावलौकिक असलेल्या सावित्रीबाई फुले प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत झालेल्या स्पर्धेत तालुक्यात प्रथम व जिल्ह्यात तृतीय क्रमांक मिळवून बहुमान मिळविलेला आहे. हा बहुमान प्राप्त करण्यासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी विद्यालयात कौतुक सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यालयाचा कौतुक सोहळा या कार्यक्रमासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पी.जी. पाटील अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी विद्यालयाला मिळालेल्या पुरस्कारांबद्दल सर्वांचे कौतुक करून या विद्यालयाने चालवलेल्या विविध उपक्रमामुळे अनेक मोठमोठे पुरस्कार मिळत असून त्यामुळे शाळेचा नावलौकिक वाढत असल्यामुळे मनस्वी आनंद झाल्याचे यावेळी कुलगुरू यांनी सांगितले.
नवीन पदावर आलेले तसेच विद्यालयाच्या भवितव्यासाठी अथक प्रयत्न करणारे विद्यालयाचे सचिव डॉ. महानंद माने, खजिनदार महेश घाडगे, प्राचार्य अरुण तुपविहिरे, उपमुख्याध्यापक बाळासाहेब डोंगरे, पर्यवेक्षक मनोज बावा यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सर्वांच्या सहकार्याने या मिळालेल्या पुरस्काराबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू यांनी शब्दसुमनांद्वारे सर्वांचे कौतुक केले आहे.
यावेळी विद्यालयाचे सचिव डॉ. महानंद माने यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, विद्यार्थी व विद्यालयाच्या उज्वल भविष्यासाठी आम्ही सर्व मिळून प्रयत्न करत आहोत. सध्या शाळेत विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी व शैक्षणिक दृष्टीने प्रगती व्हावी यासाठी अनेक बदल करण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टर पाणी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. सर्व वर्गांमध्ये एलईडी टीव्ही बसवण्यात आले असून शाळेत परसबाग व गांडूळ खताचा प्रकल्पही उभारण्यात आला आहे. शाळेची पूर्ण इमारत रंगकाम करून घेतली असून शाळेच्या सुबक बोलक्या भिंतींनी तर इमारतीची शोभा वाढविली आहे. विद्यार्थ्यांची मन:शांतता, बुद्धी कौशल्य व गुणवत्ता वाढवण्यासाठी आनापान व वाचन उपक्रम सुरू केल्याचे डॉ. महानंद माने यांनी सांगितले.
या कार्यक्रम प्रसंगी इन्स्पायर अवॉर्ड मिळालेल्या विद्यार्थ्यांचा कुलगुरू यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य अरुण तुपविहीरे यांनी केले. सूत्रसंचालन शिक्षिका सुरेखा आढाव यांनी केले तर आभार उपमुख्याध्यापक बाळासाहेब डोंगरे यांनी मानले.