शेतकऱ्यांना कांदा अनुदान देताना भेदभाव नको- संदीप आसने
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : संपूर्ण राज्यभरात १ फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना अनुदान जाहीर केले. मात्र शेतकऱ्यांचा आपल्यावर दृढ विश्वास होता मात्र याही सरकारने पूर्वीच्याच सरकार प्रमाणे शेतकऱ्यांमध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न अनुदानाच्या माध्यमातून केला आहे, असे मत माळवाडगाव येथील शेतकरी संदीप आसने यांनी व्यक्त केले आहे व तसे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.
खरीप कांदा उत्पादक व रबी कांदा उत्पादक आणि उन्हाळी कांदा उत्पादक असा भेदभाव करून केवळ लेट खरीप याच हंगामातील शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुस्ल्या सारखे आहे. त्यामुळे या कालावधीत इतर हंगामात उत्पादन घेतलेल्या कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांनी काही पाप केले का? असा प्रश्न पडतो. केवळ लेट खरीप कांदा उत्पादकांना अनुदान लाभाचा निर्णय झाला.
वास्तविक कोणत्याही हंगामातील शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळणे गरजेचे आहे. कारण त्याचाही कांदा मातीमोल भावात विक्री झाला आहे. याचा पुन्हा विचार करून १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २३ या कालावधीत राज्यातील बाजार समितीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी कांदा विक्री केला आहे, त्या सर्व शेतकऱ्यांना या योजनेत पात्र करून घेण्याचा सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी संदीप आसने यांनी केली आहे.