छत्रपती संभाजीनगर
कोणतीही शाळा ही तेथील शिक्षकांच्या नावाने ओळखली जावी-मानसिंग पवार
विलास लाटे | पैठण : सरस्वती भुवन शिक्षण संस्था ही शिक्षकांच्या गुणवत्ता वाढीसाठी सतत धडपडणारी एकमेव संस्था आहे. संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक मंडळ व शिक्षक यांच्यातील सौहार्द पूर्ण संबंध हे संस्थेच्या भविष्यासाठी निश्चितच आशादायी आहे. कोणतीही शाळा ही तेथील शिक्षक व मुख्याध्यापक यांच्या नावाने ओळखली जावी असे कार्य शिक्षकांच्या हातून घडावे असे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योगपती तथा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे माजी अध्यक्ष, औरंगाबाद भूषण मानसिंग पवार यांनी केले.
मराठवाडा ऑटो क्लस्टर औरंगाबाद येथे सरस्वती भुवन शिक्षण संस्था औरंगाबाद व आयसर IISER पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गणित व विज्ञान शिक्षकांच्या IRISE (आयराइज ) कार्यशाळा समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध उद्योगपती राम भोगले व प्रमुख पाहुणे म्हणून सहचिटणीस मिलिंद रानडे हे व्यासपीठावर उपस्थित होते.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी मानून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कृतीयुक्त अध्यापन पद्धतीने अध्यापन करावे म्हणून संस्थेचे शाखेवरील सर्व गणित आणि विज्ञान शिक्षकांसाठी ही तीन दिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहचिटणीस रानडे यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात कार्यशाळा आयोजित करण्याचा उद्देश सांगितला व पुढे देखील शिक्षकांच्या गुणवत्ता वाढीसाठी असे उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त केला.
या कार्यशाळेचा समारोप करताना अध्यक्षीय भाषणात भोगले यांनी शिक्षकांनी नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना कृतीयुक्त अध्यापन करावे व प्रज्ञावंत व अधिक कार्यक्षमतेने कार्य करणारे विद्यार्थी घडवावे व भविष्यात सरस्वती भुवन शिक्षण संस्था औरंगाबाद ही महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी अश्या पद्धतीने अध्यापन करणारी रोल मॉडेल ठरावी अशी अपेक्षा व्यक्त केली. सशक्त राष्ट्राच्या निर्मितीसाठी सर्वांनी झोकून काम करावे असे आवाहन त्यांनी केले. या स्पर्धेच्या युगात जर आपल्याला भक्कमपणे टिकायचे असेल तर कार्यक्षेत्रा बाहेर जाऊन काम करावे लागेल तरच आपण टिकाव धरू शकतो असे सांगितले.
प्रमुख पाहुणे मानसिंग पवार यांनी संस्थेच्या या स्तुत्य उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यशाळेत संस्थेतील गणित आणि विज्ञान विषयाचे शंभर शिक्षक सहभागी झाले होते. आयसर, पुणे येथील तज्ज्ञ शिक्षक सोनल थोरवे, मोहम्मद तकी व संस्थेतील शिक्षक मयुर साबळे, धनंजय जोशी, विजयानंद झोळगीकर, मनोज बोराडे, सुनिता चौधरी, वैशाली कुंभकर्ण यांनी तीन दिवस सर्व शिक्षकांना कृतीयुक्त अध्यापन कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले. सर्व शिक्षकांनी देखील उत्साहाने व उत्स्फूर्तपणे सर्व ॲक्टिविटीमध्ये सहभाग नोंदवत हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुर साबळे यांनी तर आभार धनंजय जोशी यांनी मानले.