औरंगाबाद

वीज पुरवठा सुरळीत करा; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा शेकापचा इशारा

विलास लाटे | पैठण : तालुक्यातील शेतकऱ्यांचा वीज पुरवठा थकीत बीलापोटी खंडित करण्याची मोहिम महावितरणने हाती घेतली आहे. अतिवृष्टीमुळे सर्वसमान्यांप्रमाणेच शेतकरी देखील अडचणीत आहे. पिकं, फळांना पाणी देण्याची वेळ असतांना वीज पुरवठा खंडीत केल्याने शेतकऱ्यांच्या संकटात अधिक भर पडली आहे. तेव्हा तात्काळ शेतकऱ्यांचा वीज पुरवठा सुरळीत करा, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने पैठण तहसीलदार यांना शुक्रवारी (दि.२५) निवेदनातून करण्यात आली.
तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची हातातोंडाशी आलेली पिके वाया गेली. त्यातच शासनाने पिक विमे थकविले. शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान आतापर्यंत मिळाले नाही. तालुक्यातील ७० टक्के शेतकरी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीने संकटात सापडले आहेत. जी काही वीस-तीस टक्के पिके उरली ती पण योग्य भाव मिळत नसल्याने घरातच पडुन आहेत. आजपर्यंत अतिवृष्टीमुळे शेती पाण्याखाली होती. आत्ता कुठे शेतात वापसा झाला म्हणून शेतकऱ्यांनी खरीप हंगामात झालेले नुकसान रब्बीत भरुन काढु, या आशेने गहू, हरबरा, कांदा या पिकाची लागवड केली. ही पिके नुकतीच जमीनीतून बाहेर येत नाही ते महावितरणने वीज पुरवठा खंडित करुन थकीत बिले जमा करण्याचा घाट घातला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.
एकीकडे शेतकरी आस्मानी संकटातून सावरण्याच्या तयारीत असताना दुसरीकडे महावितरणने पुन्हा वीज पुरवठा खंडित करुन नवे संकट उभे केले आहे. शासनाने पिक विमा किंवा अतिवृष्टीचे अनुदान जमा केले, तर शेतकरी विज बिल भरण्यास तयार आहेत. मात्र, तोपर्यंत खंडित वीज पुरवठा सुरळीत करुन शेतकऱ्यांची होत असलेली परवड थांबवावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदनातून करण्यात आली. नसता येत्या २९ नोव्हेंबरला शेतकऱ्यांच्या हितासाठी दावरवाडी फाट्यावर रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.
निवेदनावर शेकापचे तालुका चिटणीस भाई चंद्रशेखर सरोदे, भाई अन्सार शेख, भाई किशोर नाडे, भाई अशोक सरगर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Related Articles

Back to top button