ठळक बातम्या
शिंदे-फडणवीस सरकार जमिनीवर दिसत नसुन ते हवेत असल्याने राज्यातील जनतेचे मोठे दुर्दैव – प्रभाताई घोगरे
लोणी : मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याआधी राज्यातील नागरिकांना दळणवळण करण्यासाठी असलेले रस्ते चालता येईल असे करावेत. मुख्यमंत्री घेत असलेले निर्णयांमुळे त्यांचे सरकार जमिनीवर दिसत नसुन ते हवेत आहे, हे राज्यातील बारा कोटी जनतेचे मोठे दुर्दैव असल्याचे मत प्रभाताई घोगरे यांनी व्यक्त केले.
सौ. घोगरे पुढे म्हणाल्या की, राज्यातील अनेक भागात आजही रस्त्यांअभावी बस पोहचलेली नाही. सर्वसामान्य नागरिक खुप हालाकीत आपली उपजीविका करत आहे. त्यांना त्यांच्या दररोजच्या पोटाची खळगी भरण्याची चिंता आहे. त्यांच्या पर्यंत नागरी सुखसुविधा पोहोचवणे गरजेचे आहे. त्याचा मोठा अभाव आहे. चालता येईल असे रस्ते नाही, पिण्याचे पाणी नाही, लाईट नाही, आरोग्य सुविधा नाही, शिक्षणासाठी मुलांना मैलोन्मैल प्रवास करावा लागतो. याकडे सरकारकडून दुर्लक्ष केले जाते. ही शोकांतीका आहे. मात्र हे राज्यातील सरकार सर्वसामान्य गोरगरीब नागरिक यांच्यासाठी काम करण्यापेक्षा धनदांडग्यासाठी कार्यरत आहे. असं आज दिसतयं. मुख्यमंत्री प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड उभारणी चे निर्देश देता परंतु याचा सर्व सामान्य माणसाला काय उपयोग होईल.
दैनंदिन हेलिपॅड चा उपयोग करणारे व प्रवास करणारे लोक किती आहे. त्याची संख्या बोटावर मोजण्याइतकी पण नाही. परंतु यासाठी लागणारी जमीन, सुखसुविधा, व्यवस्थापन खर्च यापोटी कोट्यावधी रुपयांचा भार राज्य शासनाच्या तिजोरीवर पडणार आहे. हे फक्त धनदांडग्या लोकांचे चोचले पुरवणेचे धंदे आहेत. या मागं कोणतेही विधायक कारण नाही. फक्त धनदांडगे व आमदार, खासदार, मंत्री यांची ही सोय आहे. याचा सामान्य माणसाला कोणताही उपयोग होणार नाही.
आज शेतकरी, कामगार, कष्टकरी, सर्वसामान्य नागरिकांना दळणवळण करण्यासाठी रोजच्या वापरातील रस्ते चांगले नाही. सगळी गैरसोय आहे. शेतीच्या वहिवाटीचे रस्ते अतिवृष्टीत वाहुन गेले. याकडं लक्ष द्यायला या सरकारला वेळ नाही. मात्र मुख्यमंत्री आता प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड उभारणीचे निर्देश देतायेत म्हणजेच हा कारभार पुर्णपणे हवेत चालला असुन सर्वसामान्य नागरिकांशी या सरकारला कोणतेही देणेघेणे राहिलेले दिसत नाही. सरकारच्या प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड उभारणी करुन याचा उपयोग सामान्य नागरिकांसाठी नक्कीच होईल का हा मोठा प्रश्न आहे. किती नागरिक रोज हवाई मार्गाने प्रवास करतात. आज नागरिकांची बस ने प्रवास करायची ऐपत नाही.