अहिल्यानगर
राज्यपालांना तात्काळ हटविण्याची स्वराज्य संघटनेची मागणी
संगमनेर शहर : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याने कोश्यारी यांची तात्काळ हकालपट्टी करावी, अशा मागणीचे निवेदन संगमनेर तहसीलदार अमोल निकम यांना स्वराज्य संघटना व छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने देण्यात आले.
संगमनेर कार्यालय येथे स्वराज्य संघटना व स्वराज्य प्रणित छावा क्रांतिवीर सेना यांनी आंदोलन करत कोश्यारींच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली. तहसीलदार अमोल निकम यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे राज्यपालपदावर नियुक्त झाल्यापासून महाराष्ट्र राज्य, महापुरूष व महाराष्ट्र राज्याची अस्मिता याबाबत वारंवार वादग्रस्त व अवमानकारक वक्तव्ये करीत आहेत. आपल्या भाषणांतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची मोडतोड करून त्यांनी महाराष्ट्राच्या उज्वल इतिहासाची विटंबना केली आहे. नुकतेच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अत्यंत अवमानकारक वक्तव्य करून महाराष्ट्राच्या जनतेच्या भावनेशी खेळ केलेला आहे.
यापूर्वी त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्याबाब पातळीहीन वक्तव्य करून या महान दाम्पत्याच्या कार्याची अवहेलना केली आहे. आम्ही आपल्या माध्यमातून राष्ट्रपती व पंतप्रधानांना कळवू इच्छितो की, कोश्यारी यांना वेळीच आवर घालून महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून त्यांची ताबडतोब हकालपट्टी करावी. अन्य महाराष्ट्रातील जनतेच्या भावनेचा मोठा उद्रेक होऊ शकतो. सदर निवेदनाची दखल घ्यावी महाराष्ट्रात जनआंदोलनाच्या माध्यमातून काही परिणाम होतील त्यास सर्वस्वी जबाबदार राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व आपले शासन, प्रशासन असेल याची नोंद घ्यावी असा इशारा निवेदनात देण्यात आला.
यावेळी स्वराज्य चे निमंत्रक आशिष कानवडे, छावा क्रांतिवीर सेनेचे संदिप राऊत, सचिन गांजवे, लक्ष्मण सातपुते, विकास शेटे, आशिष गवळी, गणेश थोरात, सचिन कानवडे, भागवत कानवडे, गणेश फरगडे, रविंद्र डूबे, दत्ता शेटे आदिंसह स्वराज्य संघटना, स्वराज्य प्रणित छावा क्रांतिवीर सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.