गुन्हे वार्ता
किरकोळ वादातून धारदार शस्त्राच्या हल्ल्यात ३५ वर्षीय तरुणाचा खून
पैठण | विलास लाटे : पैठण एमआयडीसी परीसरातील संत एकनाथ साखर कारखान्यासमोर मंगळवारी (दि.१८) अंडा आम्लेट विकणाऱ्या दुकानात किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरूणावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली होती. यातील जखमी तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अब्दुल उर्फ सांडू कम्मा शेख (वय ३५, रा. पिराची पिंपळवाडी) असे मृत तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी पैठण एमआयडीसी पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत आरोपीला अवघ्या एका तासात जेरबंद केले.
अधिक माहिती अशी की, पैठण एमआयडीसी परिसरातील संत एकनाथ साखर कारखान्यासमोर एका अंडा आम्लेट विक्रीच्या दुकानात मंगळवारी दुपारी अब्दुल शेख व रामेर गजेसिंग बाते या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वादविवाद झाले. हा वाद विकोपाला गेला. यातून संतप्त रामेरने अब्दुलवर धारदार शस्त्राने हल्ला चढवला. यामध्ये अब्दुल हा गंभीर जखमी झाला. त्याला गंभीर अवस्थेत तात्काळ उपचारासाठी औरंगाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना अब्दुलची प्राणज्योत मावळली. घटना घडल्यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत खुनाच्या गुन्ह्यातील संशयीत आरोपी रामेरला अवघ्या एका तासात अटक केली. त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याप्रकरणी पैठण एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. पुढील तपास एमआयडीसी पोलिस करत आहेत.