कृषी

देशी गो संवर्धनासाठी भ्रृण प्रत्यारोपण तंत्रज्ञान शेतकर्यांच्या दारात

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीच्या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र, पुणे अंतर्गत खंडाबे, ता. राहुरी येथील पशुपालक सुरसिंग पवार यांच्या गोठ्यातील संकरित कालवडीमध्ये सहिवाल जातीच्या देशी गाईचे भ्रृण प्रत्यारोपण तंत्रज्ञान उपक्रमाचा शुभारंभ राहुरी कृषि विद्यापीठाचे कुलगुरु यांचे विशेष कार्य आधिकारी डॉ. महानंद माने यांच्या हस्ते झाला. या तंत्रज्ञानाबद्दल डॉ. महानंद माने म्हणाले, सध्या देशातील शुध्द देशी गोवंशाची असलेली घटती संख्या पाहता जलदगतीने उच्च उत्पादन क्षमता असणार्या गाईची संख्या वाढवण्यासाठी भ्रृण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा वापर अत्यंत गरजेचे आहे. या तंत्रज्ञानाचा प्रसार शेतकर्यांच्या दारात होणे आवश्यक आहे. याची सुरूवात झाल्याबद्दल सर्व शास्त्रज्ञ अभिनंदनास पात्र असून भविष्यात उच्च दर्जाच्या देशी गायी तयार करण्यासाठी भ्रृण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाशिवाय पर्याय नाही.
देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर व शेतकर्यांच्या गोठ्यात भ्रृण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरूवात केली आहे. या तंत्रज्ञानाच्या वापराने विद्यापीठाच्या विविध प्रक्षेत्रावर चार गीर व दोन सहिवाल कालवडीचा जन्म संकरित गाईच्या माध्यामातुन झाला आहे. या प्रकल्पातर्गत सुमारे 150 सहिवाल, गीर, थारपारकर, राठी, व लाल सिंधी या उच्च वंशावळीच्या देशी जातीच्या कालवडी निर्माण करण्याचा मानस आहे. अशी माहिती भ्रृण प्रत्यारोपण समन्वयक डॉ. विष्णू नरवडे यांनी दिली.
हे तंत्रज्ञान महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी व एनडीडीबी यांच्या सहकार्याने राबविण्यात येत असून उच्च वंशावळीचा देशी गोवंश व त्यांची संख्या वाढविण्यासाठी मोठी मदत होणार आहे असे पशुसवंर्धन विभागाचे विभाग प्रमुख डॉ. दिनकर कांबळे यांनी नमुद करून प्रकल्पातील शास्त्रज्ञांना शुभेच्छा देऊन समाधान व्यक्त केले.

Related Articles

Back to top button