अहिल्यानगर
पेमगिरी परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस; शेतातील पिकंही भुईसपाट
बाळासाहेब भोर | संगमनेर : तालुक्यातील विविध भागात गणेशोत्सवात मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली. पेमगिरी परिसरात अतिवृष्टीमुळे सर्व छोटे मोठे बंधारे पूर्ण क्षमतेने भरले आहेत. गावाला तीनही बाजुंनी तीव्र उताराच्या डोंगरदऱ्या असल्याने मुसळधार पावसानंतर मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरु होते. गावाच्या पश्चिमेकडील मातीचा असलेला छोटासा बंधाराही फुटला असून परिणामी शेताचे बांधही फुटले आहेत.
मुसळधार पाऊस व त्यात वादळ असल्यामुळे शेतातील बाजरी, मका, ज्वारी, ऊस, सोयाबीन, घेवडा, चवळी, टोमॅटो तसेच इतर चारा पिकं पूर्णतः भुईसपाट झालेली आहेत. सततच्या पावसाने डोंगरकिनारी असलेली शेतजमीन पाझरू लागली आहे. परिणामी त्यातील पिकं सडू लागली आहेत. सकाळचे धुके, दुपारी कडक ऊन व त्यात पाऊस, अशा खराब हवामानामुळे पिकांवर कीटक, बुरशी व करपा या रोगांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. अतिवृष्टीमुळे पिकांच्या सरासरी उत्पनातही मोठी घट येण्याची भीती आहे. एकीकडे जोरदार पावसामुळे शेतकरी सुखावला असला तरी दुसरीकडे मात्र शेतातील पिकं वाचविण्यासाठी मोठं संकट बळीराजासमोर उभं राहिलं आहे.