अहिल्यानगर
मौलाना सिद्दीकींच्या सुटकेसाठी मुस्लीम समाजाचे राहुरी तहसिलदारांना निवेदन
राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी : मौलाना कलीम सिध्दीकी यांना कोणतेही पुरावे नसताना राजकीय हेतुने अटक करून कारवाई केल्याच्या निषेधार्थ राहुरीत जमियत उलेमा ए हिंदच्या वतीने राहुरीचे तहसीलदार यांना निवेदन देऊन या षड्यंत्रात जे नेते, अधिकारी सहभागी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारतीय नागरीक व मुस्लीम समाजाचे धर्मगुरु मौलाना कलीम सिध्दीकी हे भारतात रहात असून, भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकाराने ते आपले जिवन जगत आहे. परंतू उत्तर प्रदेश येथे लवकरच निवडणुक होणार असल्याने नेहमी सारखं प्रशासन व भाजपा सरकारला जातीय तेढ निर्माण करण्याच्या हेतुने कोणीतरी पाहिजे असते, त्या कारणाने ए.टी.एस. ने भारताचे नागरीक असलेले मौलाना कलीम सिध्दीकी यांना निशाना केले आहे. मौलाना सिध्दीकी यांच्यावर धर्मपरिवर्तनाचे आरोप लावुन त्यांना अटक करण्यात आली आहे.
भारतीय संविधानाने समस्त भारतीयांना आपले जिवन आपल्या धर्माच्या हिशोबाने जगण्याचे अधिकार दिले आहेत. जर कोणी भारतीय नागरीक स्वतःहुन धर्म बदलत असेल किंवा मौलाना यांच्या जवळ येऊन इस्लाम धर्मात प्रवेश करत असेल तर तो त्याच्या संविधानीक अधिकार आहे. परंतू उत्तर प्रदेश भाजप सरकार ए.टी.एस. ला हाताशी धरुन आपली राजकीय पोळी भाजवण्याचा प्रयत्न करीत आहे. यासाठी नेहमी प्रमाणे त्यांना मुस्लीम समाजातील व्यक्तीची गरज असते. त्यामुळे मौलाना कलीम सिध्दीकी यांना अटक केली आहे. सदर घटनेचा राहुरीतील मुस्लिम बांधवांनी समस्त भारतीयातर्फे निषेध केला आहे. या षड्यंत्रात जे नेते, अधिकारी सहभागी असतील त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनावर इम्रान सय्यद, मुज्जूभाई कादरी, अफनान आतार, मुक्ती अफजल, मुक्ती मुजम्मील, मौलाना अस्लम, मौलाना अब्दुल कदीर, इम्रान देशमुख, बिलाल शेख, अमजद पठाण, मुस्ताक शेख, सल्लाउद्दीन शेख, हा. झाकीर खान, ॲड. शोएब देशमुख, हबीब सय्यद, नबाब शेख, रशीद इनामदार, सादिक पठाण, बाबासाहेब मकासरे आदींच्या सह्या आहेत.